उजनी वाचवा हो! - Saptahik Sandesh

उजनी वाचवा हो!

संपादकीय

अनेकांची विष पचवण्याची क्षमता वाढत आहे. पण त्याचा विपरित परिणाम कधी ना कधी होणार आहे. हे विष आम्ही किती दिवस पचवणार आहोत ? आज नसलेतरी हे विषारी पाणी कधी ना कधी घातक ठरणार आहे. शेवटी विष व विषाणू हे आपले अस्तित्व दाखवत असतातच. याचा आपणा सर्वांनाच विसर पडत चालला आहे.

पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे जगण्याचे माध्यम. पाण्यामुळे सृष्टी उभी रहाते, सृष्टी जगते. पशु-पक्षी, वृक्ष, शेतातील पीके, जलपर्णी, पाण्यातील जीवजंतू या सर्वांचे जीवन म्हणजे पाणी. करमाळा तालुक्याच्या जगण्यासाठी पाण्याची व्यवस्था विविध माध्यमातून आहे. त्यामध्ये सीना नदी, मांगी तलाव, वडशिवणे तलाव, विहीरी आणि उजनी जलाशय आदी माध्यमे आहेत. या सर्व माध्यमात उजनी धरण हे महत्वाचे माध्यम आहे. उजनी काठावरील ४५ गावासह उचलपाणी घेणाऱ्या व दहीगाव उपसा सिंचन योजना व पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास ७० ते ८० गावांत उजनीचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जाते. उजनीमुळे करमाळा तालुक्यातील शेतीसह अन्य पुरक व्यवसाय चांगल्याप्रकारे फुलले आहेत. उजनीमुळे या परिसरात जवळपास सात साखर कारखाने सुरळीत चालतात. यामध्ये तालुक्यातील आदिनाथ, मकाई, भैरवनाथ, कमलाई शुगर. त्याबरोबरच श्रीराम हाळगाव, अंबालिका, बारामती ऍग्रो या कारखान्यांना उजनीचा फायदा होत आहे. दुध व्यवसाय, मासेमारी, भाजीपाला, फळ उत्पादन अशा बाबीमुळे उजनीला तालुक्याची जीवनदायीनी म्हणून ओळखले जात आहे. पण अलीकडे उजनीचे हे स्वरूप बदलले असून उजनी म्हणजे मरणदायीनी होत आहे. पुणे जिल्हा व शहर येथील पाण्याच्या प्रवाहाबरोबर नको त्या गोष्टी या धरणात वाहत येत असल्यामुळे हे धरण म्हणजे विषारी डोह बनला आहे.

उजनी धरण हे भीमा नदीवर बांधले. या धरणामध्ये मुळा-मुठा, पवना, इंद्रायणी , कुकडी, घोड या प्रमुख नद्यांचे पाणी येते. पुणे शहरातील सर्व मैला, दुषीत पाणी, औद्योगिक वसाहतीमधील दुषीत व दुर्गंधीयुक्त पाणी, केमिकल्स हे सर्व मुळा-मुठा नदीत वाहून येते. या सर्वासह मुळा-मुठा उजनीला भेटतात. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड या मोठ्या औद्योगिक वसाहतीमधील रसायन मिश्रीत व जडधातू मिश्रीत सांडपाणी या नद्यात येते. याबरोबरच वेगवेगळ्या साखर कारखान्याचे पाणी या धरणात सोडले जाते. त्यामध्ये संत तुकाराम साखर कारखाना – मुळशी, यशवंत सहकारी साखर कारखाना – थेऊर, भीमा सहकारी साखर कारखाना-पाटस, कुरकुंभ एम. आय. डी. सी., नाव्हारा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, जगदंबा साखर कारखाना यांचा समावेश आहे. याबरोबरच भिगवण येथील औद्योगिक वसाहतीचे पाणी, विशेषतः सीनारमास प्रकल्पाचे पाणी, इतर छोट्या-मोठ्या कारखान्यातील दुषीत पाणी उजनीत येत आहे. त्यामुळे उजनीचे पाणी रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात प्रदुषीत होत आहे.

Sonaraj metal and crockery karmala

पुणे येथून येणारे जे दुषीत पाणी आहे, त्यामध्ये मानवी विष्टा मोठ्या प्रमाणात असते. सांडपाणी व दुर्गंधीयुक्त पदार्थामुळे या पाण्यात मिथेन वायू निर्माण होतो. पाण्याबरोबर हा शरीरात जातो. तो वायु शरीरात गेल्यानंतर त्याचा संपूर्ण शरीरावर मोठा विपरीत परिणाम होतो. या प्रमाणेच या पाण्यामध्ये जे इंडस्ट्रीयल वेष्ट (खराब वस्तु) येते, त्यातून दोन प्रकार वाहून येतात. पहिले जड धातू वाहून येतात तर दुसरे रसायन मिश्रीत पाणी वाहून येते. यामधील जड धातूमध्ये ऍल्युमिनिअम ,जस्त, शिसे याचा समावेश असतो. ते पाण्याव्दारे शरीरात जाते, त्यामुळे त्याचा दीर्घकालीन परिणाम होतो. विशेषतः त्याचा मुत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊ शकतो. रासायनिक द्रव्याचा परिणाम तर तात्काळ सुरू होतो; त्यामुळे फुफ्फुस, आतडी, ह्रदय, मेंदू यावरही परिणाम होतो. तिसरे जे गटारीचे दुषीत पाणी उजनीच्या पाण्यात मिसळते त्यातून विषाणू येतात. त्याचाही शरीरावर तात्काळ परिणाम होतो. त्यामुळे हागवण, काविळ, विषमज्वर असे आजार होतात. एवढेच नाहीतर यातून त्वचारोगही होतात. अशाप्रकारे वरून येणाऱ्या दुषीत पाण्याचा विपरीत परिणाम पाण्यावर होतो व त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. एवढेच नाहीतर या पाण्यात तयार होणाऱ्या वनस्पतीवरही विपरीत परिणाम होतो. तीच वनस्पती अथवा गवत खाणाऱ्या प्राण्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. जे दुषीत पाणी तयार होते तेच पाणी पीकाला दिले तर त्याचा पीकावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे फळे, फुले, जनावरांचा चारा यावर विपरीत परिणाम होतो.

Yash collection karmala clothes shop

असे दुषीत पाणी जीवन न राहता ते विष बनत चालले आहे म्हणण्यापेक्षा ते दुषीत बनले आहे. तेच दुषीत पाणी सध्या आपल्या तालुक्यातील उजनीच्या काठावरील अनेक गावच्या गावे थेट म्हणजे जलशुध्दीकरण न करता पित आहेत. त्यातून किती आजारी पडतात, किती आजाराशी संघर्ष करत आहेत आणि किती जणाकडे आजार प्रत्यक्ष भेटीला येणार याची त्यांना जाणीव नाही. परवा उजनी परिसरातील एकजण भेटले. त्यांना विचारले.. ‘का हो.. एवढे खराब कसे झाला ?’ तर ते म्हणाले.. “माझे ऑपरेशन झाले. माझ्या पोटात अडीच किलोचा दगडासारखा खडा निघाला. देवाच्या कृपेने बचावलो. उजनीच्या परिसरातील अनेकजणांना किडणीस्टोन सारखे आजार होतात. लहान मुले, वृध्द, सतत काही ना काही कारणाने आजारी पडलेली असतात, आपण मात्र काही ना काही साथीवर घालवतो. प्रत्यक्षात आपल्या परिवारातील लोक सतत आजारी पडण्याची कारणे म्हणजे दुषीत पाणी हेच आहे. तरीही आपलेपैकी अनेकजण या पाण्याला टक्कर देत आहेत. अनेकांची विष पचवण्याची क्षमता वाढत आहे. पण त्याचा विपरित परिणाम कधी ना कधी होणार आहे. हे विष आम्ही किती दिवस पचवणार आहोत ? आज नसलेतरी हे विषारी पाणी कधी ना कधी घातक ठरणार आहे. शेवटी विष व विषाणू हे आपले अस्तित्व दाखवत असतातच. याचा आपणा सर्वांनाच विसर पडत चालला आहे.

याबाबत मधल्या काळात थोडीफार जागृती सुरू झाली होती, पण आज त्याचा कोणी विचारही करत नाही; ही खेदाची बाब आहे. मागील सात वर्षापूर्वी राज्य शासनाचे प्रदुषण नियंत्रण मंडळ, पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तसेच इंदापूर पंचायत समितीचे आरोग्य आधिकारी यांनी याबाबत काही गावातील पाण्याची तपासणी करून घेतली. त्यानंतर शास्त्रज्ञांनी जो अहवाल दिला तो धक्कादायक आहे. त्यांनी हे पाणी वापरण्यासच अयोग्य असल्याचे म्हटले आहे. जर हे पाणी वापरण्यास अयोग्य तर ते पाणी पिण्याचा प्रश्नच येत नाही. पुणे येथील प्रियवंदा जोशी यांनी उजनीसाठी आंतरराष्ट्रीय परिषद स्थापन केली असून या पाण्याबाबत त्यांनी आंतरराष्ट्रीय संशोधकांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्येही अनेक तज्ञांनी पाणी प्रदुषीत असल्याचे ठाम सांगितले व पाणी वापरणे धोक्याचे असल्याचे स्पष्ट केले.

S.K. collection bhigwan

दुसरी बाजू म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना हा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे; याची अजूनही का जाणीव झाली नाही व त्यांच्या पर्यंत हा प्रश्न कोणी मांडला नाही. त्यांच्या बहुव्यापी कामामुळे त्यांच्यापर्यंत हा प्रश्न गेला नसावा किंवा त्यांचे लक्ष गेले नसेल, पण त्यांची मदत घेतली पाहिजे. खरंतर या प्रश्नासाठी तालुक्यातील सर्वच गटातटाच्या प्रतिनिधींनी राजकारण विरहीत एकत्र येऊन याचा मुकाबला केला पाहिजे. हा मुकाबला दोन प्रकारे करावा लागणार आहे. तातडीने यात उजनीत जे प्रदुषीत पाणी सोडले जाते त्याची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे व दुसऱ्या भागात आहे ते प्रदुषीत पाणी शुध्द केले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत व ते काम कोणा एकट्या दुकट्याचे नाही. त्यासाठी दोन्ही शासनाची गरज आहे.

Sonali ply and furniture shop karmala

विद्यमान खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर व आमदार संजयमामा शिंदे यांनीही या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. हे प्रश्न लोकसभा, विधानसभेत मांडून त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधीनी प्रयत्न केलेतर केंद्रशासन व राज्यशासन या दुषित पाण्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेईल. तरच उजनीचे रूप पालटू शकेल. तालुक्यातील उजनीसाठी काम करणाऱ्या उजनी धरणग्रस्त समस्या निर्मुलन समिती, उजनी बचाव संस्था, उजनीसाठी कार्यरत असणाऱ्या अन्य संस्था त्याबरोबरच पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था व सामाजीक संस्था आणि कार्यकर्ते यांनी या प्रश्नावर सतर्क होण्याची गरज आहे. वेळीच सर्तक राहिलो नाहीतर नंतर ते काम खूप कठीण होणार आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन उजनीला वाचवण्याचे काम केले पाहिजे. उजनी वाचली तरच येथील माणूस वाचणार आहे, हे सुत्र विसरून चालणार नाही. जर हे सुत्र विसरलो तर कोणाचेच काही खरे नाही; हे सुध्दा लक्षात घेतले पाहिजे. आपण सर्वांनीच या प्रश्नासाठी सतर्क व्हावे व काही तरी ठोस करावे हीच अपेक्षा..!

✍️डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, मो.९४२३३३७४८०

उजनी प्रदूषणाविषयीची Documentary

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!