सामाजिक कार्यात खाटेर परिवार आघाडीवर – शंभुराजे जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.५) : करमाळा तालुक्यात सामाजिक कार्य करण्यात श्रेणिकशेठ खाटेर व त्यांचा परिवार हा आघाडीवर असून वेगवेगळ्या क्षेत्रात ते सामाजिक कार्य करतात. हे काम असेच वेगवान पध्दतीने घडावे; असे आवाहन जगताप गटाचे युवा नेते व खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभुराजे जगताप यांनी केले.

श्रेणिकशेठ खाटेर व नगरसेविका संगीता खाटेर यांनी करमाळा शहरातील भाविकांना मोफत शिखरशिंगणापूर व गोंदवले तीर्थक्षेत्रावर तीर्थयात्रा सुरू केली आहे. त्याची पहिली फेरी आज (ता. ५) बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने निघाली असताना शुभेच्छा देताना श्री.जगताप बोलत होते. याप्रसंगी प्रवासी गाडीचे पूजन डॉ.ॲड.बाबूराव हिरडे व शंभुराजे जगताप यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी नाभिक संघटनेचे अध्यक्ष नारायण पवार, पत्रकार संजय शिंदे, बँक अधिकारी शंकर रासकर, श्री. अनारसे, श्री. वाघमोडे, व्यापारी नितीन दोशी, परदेशी महाराज, संतोष गानबोटे, विठ्ठलराव भणगे यांचेसह नगरसेविका संगीताताई खाटेर, सौ. लुंकड, सौ. शिंदे, सौ.मंडलेचा, माजी नगरसेविका मंदाताई पवार, सौ. महाजन, सौ. शिगची अशा महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. यावेळी प्रास्ताविक श्रेणिकशेठ खाटेर यांनी केले तर आभार वर्धमान खाटेर यांनी मानले.
श्रेणिकशेठ खाटेर यांना सामाजिक कार्याची मोठी आवड आहे. सुरूवातीला त्यांनी दारू मुक्तीसाठी अनेकांना शेषेराव महाराज यांचेकडे बुलढाण्याला नेले होते. त्यानंतर त्यांनी भागवत कथा, रामायण कथा अशा वेगवेगळ्या संतांच्या कथा आयोजित केल्या. करोडो रूपयाची मिळकत गोरक्षण संस्थेला देऊन गुरूगणेश दिव्यरत्न गोशाळा सुरू केली आहे. याबरोबर समाजातील अनेक घटकांना मदत करण्याचे काम ते करतात. आता श्री क्षेत्र गोंदवले महाराज येथे दर पौर्णिमेला मोफत भक्तांना घेऊन जाण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. हजारो व्यक्तींची नेत्र तपासणी करून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाही त्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. या त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा ! …ॲड.डॉ.बाबूराव हिरडे