करमाळ्यातील रस्त्यासंदर्भात झालेल्या बैठकीत गोंधळ - कोणताही ठाम निर्णय होत नसल्याने आमदार शिंदे यांनी सोडली बैठक.. -

करमाळ्यातील रस्त्यासंदर्भात झालेल्या बैठकीत गोंधळ – कोणताही ठाम निर्णय होत नसल्याने आमदार शिंदे यांनी सोडली बैठक..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.५) : करमाळा शहरातील खंडोबा मंदिर ते देवीचा माळ पायथा रस्त्याच्या संदर्भात आज (ता.५) येथील तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली होती, यामध्ये येणाऱ्या काळात होणारे गंभीर अपघात टाळण्यासाठी व निष्पाप लोकांचे प्राण वाचवण्यासाठी
खंडोबा मंदिर ते श्री देवीचामाळ पायथा रस्त्याच्या दोन्ही बाजूने पंधरा फुटाचा सर्विस रोड करणे, देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्त्याचा कॉर्नर मोठा करणे, रस्त्याच्या मधोमध येणारे गेवराईचे छोटे मंदिर बाजूला घेणे या विषयावर चर्चा करण्यात आली परंतु मुख्य विषय बाजूला ठेवून एकच गोंधळ उडाल्याने या बैठकीतून आमदार संजयमामा शिंदे यांनी बैठक सोडली.

या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग वीज महामंडळ व त्याचे ठेकेदार प्रतिनिधी श्री कमलाभवानी देवीचे ट्रस्ट सदस्य तसेच श्री देविचामाळ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी छोटे मंदिर बाजूला घेण्यावरून काही जणांनी विनाकारण मोठा गोंधळ केला
व जाणीवपूर्वक अनेक लोकांना आपले मत मांडू दिले नाहीत. त्यामुळे ही बैठक गोंधळात होऊन कोणताही ठाम निर्णय होऊ शकला नाही,
गोंधळाची परिस्थिती पाहता आमदार संजय मामा शिंदे बैठक सोडून निघून गेले. याप्रसंगी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री देवीचामाळ पायथा चौक व खंडोबा मंदिर चौक हा मृत्यूचा सापळा होणार असून, या रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्विस रोड असावा, अशी ग्रामपंचायतीची मागणी आहे, शिवाय खंडोबा मंदिराकडून देवीच्या माळावर जाणारा कॉर्नर मोठा करावा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा लेखी पत्र आम्ही बांधकाम खात्याला दिली आहे, या पत्रावर सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत, या ठिकाणी भावी काळात होणारे मोठे अपघात लक्षात घेता योग्य तो निर्णय प्रशासनाने घ्यावा. – (महेश सोरटे सरपंच, देवीचामाळ)

हा प्रश्न भावनिक न करता येणाऱ्या काळात होणारे अपघात टाळण्यासाठी पायथ्याशी असलेले छोटे मंदिर बाजूला घ्यावे व दोन्ही बाजूनी 15 फुटाचा सर्विस रस्ता करावा,
या दोन्ही बाजूची जागा कमलादेवी ट्रस्टच्या मालकीची आहे हा रस्ता करण्यास आम्ही मान्यता दिली आहे. – (सोमनाथ चिवटे, अध्यक्ष, कमलाभवानी मंदिर ट्रस्ट)

काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी व वैयक्तिक वादातून या लोक हिताच्या कामाला विरोध करत आहेत,
या रस्त्याच्या दुतर्फा बाजूने 15 मीटरचा सर्व्हिस रस्ता करावा,
पायथ्याशी असलेले चार बाय चार चे मंदिर एका बाजूला घ्यावे
शिवाय खंडोबामाळ येथे निर्माण होणाऱ्या चौकात व ही सर्व कामे ठेकेदारांनी करून द्यावी, याबाबत आमदार संजयमामा शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, स्वार्थासाठी चांगले कामाला विरोध करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करणे गरजेचे आहे. – (महेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!