ऊत्तरेश्वर देवस्थान यात्रा उत्साहात; कृषी प्रदर्शन, बैलगाडा शर्यत व कुस्ती मैदानाने भाविकांची गर्दी -

ऊत्तरेश्वर देवस्थान यात्रा उत्साहात; कृषी प्रदर्शन, बैलगाडा शर्यत व कुस्ती मैदानाने भाविकांची गर्दी

0

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानचा महाशिवरात्री यात्रा महोत्सव दि. १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत धार्मिक व आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व कृषीविषयक उपक्रमांनी भाविकांची गर्दी उसळली.



धार्मिक विधी व कार्यक्रमांनी यात्रेला प्रारंभ

महाशिवरात्रीपासून मंदिर परिसरात तीन लघुरुद्र अभिषेक, ग्रामस्थांचे अभिषेक, शिवलीलामृत पारायण, हरिजागर, कीर्तन सेवा, छबिन्याच्या पहाटे ग्रामदेवतेस दंडवत सेवा, ब्राह्मण व मानकरी भोजन तसेच भंडारा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सांगवी येथून आलेल्या निंबाळकर महाराजांच्या दिंडीचे उत्तरेश्वर मंदिर परिसरात स्वागत करण्यात आले.

पहिल्यांदाच चारदिवसीय भव्य कृषी प्रदर्शन

यंदा यात्रेत प्रथमच दि. १७ ते २० फेब्रुवारीदरम्यान चार दिवसीय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दीडशेहून अधिक स्टॉल्समध्ये शेतीविषयक अवजारे, ट्रॅक्टर व विविध वाहन कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. शेती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या हस्ते झाले. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी विविध स्टॉलला भेट दिली या वेळी त्यांच्या सोबत मान्यवरांची उपस्थिती होती    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंदवे गुरूजी यांनी केले तर आभार गोरख खानट यांनी मानले

कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना मान्यवर

‘श्री उत्तरेश्वर केसरी’ बैलगाडा शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद

दि. १९ फेब्रुवारी रोजी देवस्थान कमिटी व सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केम–करमाळा रस्त्यालगत देवस्थानच्या जमिनीत ‘श्री उत्तरेश्वर केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शर्यतीत सागर पवार यांच्या बैलगाडीने विजय मिळवला. विजयानंतर ग्रामस्थांनी जल्लोष करत मिरवणूक काढली व देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सायंकाळी मंदिर सभागृहात जुगलबंदी भारुड कार्यक्रमालाही भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

पारंपरिक कुस्ती मैदानात थरारक लढती

शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी पारंपरिक उत्तरेश्वर कुस्ती मैदान भरवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कुस्त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. अंतिम ₹१,७०,०००/- इनामाची कुस्ती बनकर व महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. या कुस्तीत बनकर विजयी ठरले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

पोलीस बंदोबस्तात यात्रा शांततेत संपन्न

यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टने रात्रंदिवस परिश्रम घेतले. किरकोळ दागिने चोरीच्या घटना वगळता यात्रा शांततेत पार पडली. रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांनी देवस्थानास भेट देऊन बैलगाडा शर्यतीस उपस्थिती दर्शवली व यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी यात्रा कमिटीच्या नियोजनाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!