पोथरे येथील माजी सैनिक पांडुरंग झिंजाडे यांचे निधन -

पोथरे येथील माजी सैनिक पांडुरंग झिंजाडे यांचे निधन

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२२:पोथरे (ता. करमाळा) येथील माजी सैनिक कै. पांडुरंग शामराव झिंजाडे (वय-८०) यांचे  काल ( ता. २१ ) रात्री ९.३० वाजता  निधन झाले. त्यांच्या निधनाने गावाने एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष सैनिक गमावला आहे.

८ नोव्हेंबर १९४५ रोजी जन्मलेल्या पांडुरंग झिंजाडे यांचे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण व्यतीत गेले. वडिलांच्या अकाली निधनानंतर आई द्वारकाबाई यांनी मोठ्या कष्टाने कुटुंबाचा सांभाळ केला. अशा परिस्थितीत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला हातभार लावला. काही काळ त्यांनी गिरणी चालक म्हणून काम केले.

देशसेवेची ओढ मनात बाळगून त्यांनी ८ नोव्हेंबर १९६५ रोजी सैन्यात दाखल झाले. नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी देशाच्या दुर्गम व बर्फाळ भागात सेवा बजावली. १९७१ च्या भारत-पाक युद्धात त्यांनी १४ दिवस प्रतिकूल परिस्थितीत झुंज देत शौर्य गाजवले. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना विविध पदके प्राप्त झाली. शिपाई ते लान्स नायक असा प्रवास करत ते रणगाडा चालक म्हणून कार्यरत होते. नोव्हेंबर १९८१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी १९८६ ते २००७ या काळात भारतीय स्टेट बँक, करमाळा येथे चौकीदार म्हणून सेवा दिली. गरिबीचा जवळून अनुभव घेतल्यामुळे त्यांनी शेती विकासासाठी प्रयत्न करत कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावली. तसेच गोरगरिबांना मदत करणे, नातेवाईकांप्रती सढळ हाताने वागणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या पश्चात मुले रमेश, राजेश, तसेच कन्या सौ. सुरेखा आढाव व सौ. संध्याराणी हिरडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!