मद्यधुंद ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२१: शहरातील जामखेड चौक येथे नाकाबंदी दरम्यान बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या व मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 20 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10.26 वाजण्याच्या सुमारास जामखेड चौक, करमाळा येथे नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशानुसार नाकाबंदी सुरू होती. यावेळी समोरून येणारा ट्रक चालक हा रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले.
सदर ट्रकचा क्रमांक टी.एन. 52 ए.डी. 0569 असा असून चालकाची चौकशी केली असता चालक मुस्ताक हसनमहमद (वय 39, रा. झिरका, जिल्हा मेवात, हरियाणा) याच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याने त्याची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली. याप्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


