जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला; सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप -

जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला; सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून केम येथे एका वृद्ध शेतकऱ्यावर धारदार हत्यारे व लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. तसेच मुलाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोपही करण्यात आला असून पाच जणांविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शंकर रामचंद्र तळेकर (वय 69, रा. केम ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. सध्या त्यांच्यावर कंदर येथील यशश्री मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाचा उमेश इंगळे याने गावातील कुसुम गावडे यांच्या हिस्स्याची जमीन खरेदी केली होती. या व्यवहारावरून भारत विचितकर व त्यांच्यात वाद सुरू होता.
दि. 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11.15 वाजता शंकर तळेकर हे वडशिवणे तळ्यावरील मोटार बंद करून परत येत असताना बापू धोंडीबा विचितकर, भारत बापू विचितकर, जोतीराम बापू विचितकर, दत्तात्रय बापू विचितकर व सचिन दत्तात्रय विचितकर यांनी त्यांना अडवून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
“तू आमची जमीन तुझ्या भाच्याला घेऊन दिली,” असा आरोप करत भारत विचितकर याने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादींनी हात आडवा धरल्याने मार कोपरावर बसला. तसेच सचिन विचितकर याने लोखंडी रॉडने उजव्या पायावर मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे.
भांडणाचा आवाज ऐकून पुतण्या पंडित तळेकर व मुलगा अभिजित तळेकर घटनास्थळी आले असता, जोतीराम व दत्तात्रय विचितकर यांनी काठ्यांनी त्यांनाही मारहाण केली. दरम्यान, भारत विचितकर याने अभिजित तळेकर यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळा वजनाची सोन्याची चैन ओढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी करमाळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!