सरपडोह शाळेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण मेळावा

करमाळा(प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरपडोह येथे १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी मेळावा, शालेय स्टेज उद्घाटन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमास माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पहिल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा विशेष सन्मान
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती Savitribai Phule यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेचे पहिले विद्यार्थी वसंत बंडू रंदवे (वय ८१) तसेच पहिल्या विद्यार्थिनी सुमन जयवंतराव घोगरे-निंबाळकर (वय ७७) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सरपडोहच्या सरपंच मालनताई पांडुरंग वाळके यांचीही उपस्थिती होती.
नवीन स्टेजचे उद्घाटन व दात्यांचा गौरव
कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण मारुती अडसूळ यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात आलेल्या शालेय स्टेजचे उद्घाटन करण्यात आले. विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण मारुती खराडे व प्रगतशील बागायतदार अशोक जयवंतराव घोगरे यांनी सुमारे १ लाख २५ हजार रुपये खर्चून उत्कृष्ट स्टेज उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
अभ्यासिका व पुस्तकांसाठी मदतीच्या घोषणा
यावेळी मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्यासाठी मदत करण्याचे जाहीर केले. गणेश करे पाटील यांनी ११ हजार रुपयांची पुस्तके देण्याची घोषणा केली, तर राज्य विक्रीकर अधिकारी सुधीर अडसूळ यांनी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करत ५ हजार रुपयांची पुस्तके देण्याचे जाहीर केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
शाळेचा माजी विद्यार्थी यशराज अरुण चौगुले याची सातारा सैनिक स्कूलमध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणारे साक्षी खराडे, शिवानी भंडारे, समृद्धी गवारे, समीक्षा मोटे व विशंभू पवार यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली मने
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाट्यप्रयोग यांसह विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या नृत्य सादरीकरणालाही विशेष दाद मिळाली. गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत बक्षिसांचा वर्षाव केला.
माजी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती
कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. साडे केंद्राचे केंद्रप्रमुख वसंत बदर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे राख सर, काळदाते सर, शिंदे सर, थोरवे सर तसेच घोटी येथील दुधे सर यांनीही उपस्थिती दर्शविली.
शाळेच्या विकासासाठी सव्वा लाखांहून अधिक निधी
शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेच्या भौतिक विकासासाठी माजी विद्यार्थी व ग्रामस्थांकडून ७० हजार रुपये, यात्रा वर्गणीतून २५ हजार रुपये तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ४० हजार ४१५ रुपयांची बक्षिसे असा एकूण १ लाख ३५ हजार ४१५ रुपयांचा निधी जमा झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेकांचे योगदान
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकृष्ण अडसूळ यांनी केले. सूत्रसंचालन दादासाहेब माळी यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच तथा माजी विद्यार्थी संघाचे सदस्य नाथाराव रंदवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, ग्रामस्थ व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.
