निंभोरे येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी;व्याख्यानमालेतून इतिहासाचा जागर

केम(प्रतिनिधी/संजय जाधव):निंभोरे येथे १९ मे २०२६ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील युवकांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बौद्धिक व्याख्यानमालेने विशेष आकर्षण ठरले.

या व्याख्यानमालेअंतर्गत महाराष्ट्रातील नामवंत वक्ते संपतराव गारगोटे यांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रभावी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या ओजस्वी शैलीत त्यांनी संभाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्यनिष्ठा आणि त्याग यांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच महाराष्ट्रातील विविध महापुरुषांच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी निंभोरे ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. गावातील नागरिक, युवक व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी निंभोरे ग्रामस्थांचे आभार मानत, भविष्यातही अशा बौद्धिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



