सावडी फाट्यावरून पाणबुडी मोटार चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सावडी फाटा परिसरातून रस्त्याच्या कडेला ठेवलेली पाणबुडी मोटार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत उदयसिंह श्रीमंत झोळ (वय 39, रा. वाशिंबे ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शेती व्यवसाय करतात. शेतातील विहिरीसाठी त्यांनी पुणे येथून पाणबुडी मोटार ट्रान्सपोर्टमार्फत मागवली होती.
दि. 9 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता कोर्टी येथील सिद्धिविनायक रोडलाईन्स ट्रान्सपोर्टमधून मोटार घेऊन उदयसिंह झोळ व सोमनाथ आदिनाथ झोळ हे दोघे मोटारसायकलवरून गावाकडे निघाले होते. सावडी फाटा येथे आल्यानंतर मोटारसायकल पंचर झाल्याने त्यांनी मोटार रस्त्याच्या कडेला ठेवली. त्यानंतर पंचर काढण्यासाठी जवळच्या दुकानात गेले असता तेथे सुविधा नसल्याने सोमनाथ झोळ हे सावडी गावात गेले.
दरम्यान, उदयसिंह झोळ परत मोटार ठेवलेल्या ठिकाणी आले असता तेथे ठेवलेली पाणबुडी मोटार गायब झाल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटार मिळून आली नाही.
चोरीस गेलेल्या मोटारीमध्ये लक्ष्मी कंपनीची 7.5 एचपी, 3 स्टेजची पाणबुडी मोटार असून तिची किंमत सुमारे 24 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


