पुराव्यासहित बालमजुरीची तक्रार नोंदविण्यासाठी राष्ट्रीय व्हॉट्सॲप नंबर सुरू करावा- झिंजाडे यांची बाल आयोगाकडे मागणी -

पुराव्यासहित बालमजुरीची तक्रार नोंदविण्यासाठी राष्ट्रीय व्हॉट्सॲप नंबर सुरू करावा- झिंजाडे यांची बाल आयोगाकडे मागणी

0

करमाळा (प्रतिनिधी) : बालमजुरी व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विशेष सार्वजनिक व्हॉट्सॲप नंबर जाहीर करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून बालकांची तात्काळ सुटका करणे शक्य होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रमोद झिंजाडे यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय बाल आयोग, नवी दिल्ली तसेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांना यासंदर्भात सविस्तर पत्र पाठवले आहे. या पत्रात देशभरातील जागृत नागरिकांना बालमजुरी किंवा मुलींवरील छेडछाडीच्या घटना त्वरित प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकृत व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रस्तावानुसार, एखाद्या हॉटेल, कारखाना, वीटभट्टी किंवा अन्य ठिकाणी बालकांकडून काम करून घेतले जात असल्याचे आढळल्यास नागरिकांनी मोबाईलद्वारे संबंधित बालकाचा फोटो काढून तो गुगल मॅपच्या अचूक लोकेशनसह अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचा आहे. त्यानंतर संबंधित विभागाला ही माहिती त्वरित प्राप्त होऊन २४ ते ४८ तासांच्या आत घटनास्थळी पोहोचून त्या बालकाची सुटका करण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या यंत्रणेमुळे तक्रारदाराची ओळख गुप्त राहील तसेच स्थानिक पातळीवरील धोके टाळता येतील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्राप्त माहितीच्या आधारे बाल आयोग संबंधित पोलीस प्रशासन, कामगार विभाग आणि बालकल्याण समितीकडे तक्रार वर्ग करेल व तातडीने कारवाई होईल, असे झिंजाडे यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकही बालहक्क रक्षक म्हणून काम करू शकतील. केवळ एका व्हॉट्सॲप संदेशाच्या माध्यमातून एखाद्या बालकाचे आयुष्य वाचवणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बालमजुरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाधारित ही संकल्पना प्रभावी ठरू शकते. त्यामुळे बालमजुरी करून घेणाऱ्या घटकांवर कायद्याचा मोठा वचक निर्माण होईल, असे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!