‘महिला पतंजली योग समिती’च्यावतीने ‘आरोग्य विषयक’ शिबिर संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात ‘महिला पतंजली योग समिती’च्यावतीने 6 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य विषयक शिबिर घेण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना करमाळा तालुका महिला प्रभारी डॉ सुनिता दोशी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, योगा आणि प्राणायामामुळे फक्त शारीरिकच ऊर्जा निर्माण होत असते असे नसून, योग प्राणायामामुळे मानसिक स्वास्थ्य ही व्यवस्थित राहते. महिलांना आरोग्यासाठी योग प्राणायाम किती गरजेचा आणि महत्त्वाचा आहे हे त्यांनी यावेळी पटवून दिले.
यावेळी त्यांनी स्वतःचे अनुभव कथन करून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला वर्ग योगसाधने साठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली असे समाजसेवक तानाजी महामुनी तसेच ज्यांचे योग वर्गात नित्य मार्गदर्शन असते अशा योगशिक्षिका सौ सुलभा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारत स्वाभिमान तालुका प्रभारी हनुमान सिंग परदेशी, पतंजली योग समिती तालुका प्रभारी बाळासाहेब नरारे, महिला महामंत्री सौ माधुरी साखरे, तसेच योग वर्गातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका युवा प्रभारी प्रवीण देवी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ पूनम देवी तर आभार सौ कावेरी देशमुख यांनी मानले.