कोर्टी येथे कर्तुत्ववान महिलांचा सन्मान व बालविज्ञान प्रदर्शन संपन्न

करमाळा : काल (8 मार्च) जागतिक महिला दिनानिमित्त परिवर्तन प्रतिष्ठान संचलित, डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी प्रशालेच्या वतीने करमाळा तालुक्यातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान व भव्य बालविज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शितलताई गणेश करे-पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. विद्या अमोल दुरंदे उपस्थित होत्या. या प्रसंगी सामाजिक, राजकीय, आरोग्य, ग्रामविकास व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या करमाळा तालुक्यातील महिलांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये ॲड. वर्षा नानासाहेब साखरे (रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग बार्शी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य ), नलिनी संजय जाधव (राजकीय व सामाजिक कार्य), अनुसया रघुनाथ शिंदे (प्रगतशील शेतकरी), ह.भ.प. सपनाताई बाळासाहेब साखरे, राजुरी (राज्यपाल पुरस्कार विजेती कीर्तनकार ), पूजा मोहन मारकड (ग्रामविकास,विद्यमान लोकनियुक्त सरपंच, विहाळ),मा.ह.भ.प. गीतांजली राजेंद्र अभंग (युवा कीर्तनकार), गायत्री महेश कुमार कुलकर्णी (आदर्श सरपंच, मांजरगाव), मंजुषा जगन्नाथ टेकाडे ( उत्कृष्ट परिचारिका), प्रमिला सोपान जाधव (बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्य) यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
सुरवातीला दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुशीला हरिश्चंद्र जाधव यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सरपंच डॉ. अमोल दुरंदे, केंद्र प्रमुख आदिनाथ देवकाते सर, शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, पत्रकार भिसे सर,मंगेश अभंग सर, कारंडे सर, नाळे सर,कृषी सुपरवायझर नानासाहेब साखरे, राजुरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, मारुतीआबा घोगरे उपस्थित होते.