विहाळ येथील तलावात प्रथमच कुकडीचे पाणी दाखल…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्याला कुकडी प्रकल्पाचे 5.50 टीएमसी पाणी मंजूर असले तरी प्रत्यक्षात या प्रकल्पातील कॅनॉलची अनेक कामे रखडलेली असल्यामुळे कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावांमध्ये अद्यापही कुकडीचे पाणी दाखल झालेले नव्हते. कुकडी प्रकल्प हा 7 तालुक्यांसाठी असून त्यामध्ये करमाळा हा टेलचा तालुका आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्प अंतर्गत येणारी पोंधवडी या चारीचे काम पूर्ण करून या चारीवरील गावांना आपण पाणी देऊ असे वचन दिले होते. त्याप्रमाणे विहाळ तलावात प्रथमच कुकडीचे पाणी दाखल झाले आहे. अशी माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.
कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा- हुलगेवाडी चारीचा शुभारंभ गेल्यावर्षी आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते व मा.आ.जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता. मागील 3 पंचवार्षिक योजनेत या कामासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता त्यामुळे हे काम रखडले होते.
याबाबत बोलताना पुढे म्हटले कि, या चारीचे उर्वरित काम झाल्यानंतर इतर गावांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. संजयमामा शिंदे यांनी 9 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर करून काम सुरू केले होते, 18 मार्च 2023 रोजी या चारीतून पाणी बाहेर पडून नजिकच्या विहाळच्या तलावात सोडण्यात आले. भविष्यात, याच चारीतून गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या कोर्टी, गोरेवाडी, हुलगेवाडी, कुस्करवाडी, पोंधवडी, राजुरी, विहाळ, वीट, अंजनडोह, सोगांव, मांजरगाव गावातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. असेही आमदार संजयमामा शिंदे यांनी म्हटले आहे.