3 टन‌ कलींगड विकून गाडीचे भाड्यापुरतेही पैसे न झाल्याने कलींगड उत्पादक शेतकरी अडचणीत.. - Saptahik Sandesh

3 टन‌ कलींगड विकून गाडीचे भाड्यापुरतेही पैसे न झाल्याने कलींगड उत्पादक शेतकरी अडचणीत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कलींगडाचे भाव पडल्याने कलींगड उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, बिटरगाव (ता.करमाळा) येथील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याने तीन‌ टन‌ कलींगड विकून त्यांच्याकडेच 636 रूपये फिरले आहेत. सोलापूर बाजार समितीकडे विक्रीस पाठवलेल्या कलींगडाचे गाडीचे भाड्यापुरतेही पैसे न झाल्याने यानिमित्ताने बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतीमधील वास्तव लोकांच्यासमोर आले आहे.

बिटरगाव हे करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या काठावर असणारे गाव असून, या परिसरातील शेतकऱ्यांना उजनी धरणामुळे पाण्याची फारशी अडचण नसते, ऊस केळीसारखी पिके घेत असली तरी उसाला उसाचे बिल मिळण्यासाठी होणारा विलंब केळीचा दर मिळण्यामागे असलेले अनियमितता यामुळे अनेक शेतकरी याशिवाय वेगळी कमी दिवसात येणारी पिके घेत असतात, यामध्ये ऊसतोड झाल्यानंतर उसाच्या शेतात खरबूज कलिंगडासारखी पिके मोठ्या प्रमाणावर या परिसरातील शेतकरी घेतात.

लाखो रुपयाचा खर्च करून हे कलिंगडासारख्या पिकांमध्ये मार्केटपर्यंत पोहोचवण्याचे भाडेही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आले असून येथील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याने 30मार्च रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तीन टन कलिंगड विक्रीसाठी पाठवले होते याचा वाहतूक खर्च 3000 रुपये झाला हमाली सह 960 खर्च झाला परंतु हे कलिंगड 3400 रुपयाला विकले यामुळे खर्च जाऊन वजा 560 रुपयाची पट्टी त्यांच्या हातात आली आहे सध्या ही पट्टी परिसरातील शेतकऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या माध्यमातून बागायतदार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीतील वास्तविकता समोर येत असल्याचे बोलले जात आहे.

करमाळा तालुक्यातील उजनी परिसरातील शेतकरी नवनवीन पिके घेऊन आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात, खरबूज, कलिंगड यासारखी कमी दिवसात येणाऱ्या पिकांकडेही शेतकऱ्यांचा मोठा कल असतो, परंतु सध्या उत्पादन खर्चही मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु कोणत्याही शहरात प्रत्यक्ष ग्राहकांनासाठी फळांचे व पालेभाज्यांचे दर कमी असल्याचे दिसत नाही, यामुळे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात काही न मिळता केवळ दलालांचेच दिवस चांगले असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे. – महेंद्र पाटील (प्रगतशील शेतकरी बिटरगाव ता करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!