करमाळा भूमिअभिलेख कार्यालयाच्या विरोधातील
आंदोलनाला उपअधीक्षकांच्या आश्वासनानंतर २ दिवसासाठी स्थगिती
केम (संजय जाधव) : करमाळा भूमिअभिलेख कार्यालयाच्या कामकाजा विरोधात आज (सोमवार दि. १० एप्रिल) पासून शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी आमरण उपोषण पुकारले होते. आज फरतडे शेतकऱ्यांसह भुमीअभिलेख कार्यालयासमोर आले असता भुमीअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक प्रकाश कांबळे यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून दोन दिवसात सर्व तक्रारदारांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती शाहुराव फरतडे यांनी दिली.
या आंदोलनाविषयी अधिक माहिती देताना शाहूराव फरतडे म्हणाले की, उच्च न्यायालयाचा बंदी आदेश असताना केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून मनमानी पद्धतीने दुरुस्ती योजना राबवल्या जात आहेत. तालुक्यातील ११८ गावांतील शेतकरी गट नकाशे, मोजणी, रस्त्याचे वादविवाद, मालमत्ता उतारे, फाळणी नकाशे यासह इतर कामासाठी येतात. मात्र, तालुका कार्यालयामध्ये कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये बेबनाव असल्यामुळे कोणीही सहकार्यासाठी पुढे येत नाही. नक्कल मागणीचे अर्ज पंधरा दिवसांपासून दोन दोन महिने पडून असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुपारच्या सत्रामध्ये कोणीच कर्मचारी भेटत नाही. कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा कसलाही अंकुश नसल्याने तालुक्यातील नागरिकांची ससेहोलपट होत आहे. नागरिकांची राहत्या घरांची व शेतीशी निगडीत कामे या कार्यालयात असतात. प्रॉपर्र्टी कार्डावरील कमी – जास्तीच्या नोंदीसह सात-बारा उताऱ्यांशी निगडित व हद्द कायम मोजणीच्या कामासाठी रोज शेकडो नागरिक येत असतात. चाळीस ते पन्नास कि.मी पायपीट व प्रवास करून येणाऱ्या नागरिकांना कामाची माहिती व्यवस्थित मिळणे अपेक्षित असते; पण येथील काही कर्मचारी व अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन पाठवितात, तर काहीजण सुरुवातीपासूनच चार-आठ दिवसांनी या, असे पोकळ आश्वासन देऊन अक्षरश: हाकलून लावतात. कोणत्याही कामासाठी कमीत कमी दहा ते पंधरा हेलपाटे मारायला लावतात नकाशा, एकत्रीकरण तक्ता, टिप्पन उतारा, सर्व्हे नंबर, गट मोजणीसाठी लागणारी कागदपत्रांची नक्कल मागणी अर्ज केल्यानंतर ही कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिक हवालदिल होऊन मागेल तितके पैसे देऊन सुद्धा हेलपाटे मारून काकुळतीला येतात. सांगितलेल्या तारखेला येऊनसुद्धा नकला मिळत नाहीत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कसलीही एकवाक्यता नसल्याने त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. या मनमानी कारभारा विरोधात हे आंदोलन हे आंदोलन सुरु करण्यात आले होते.
या आंदोलनास नगरसेवक संजय सावंत, माजी नगरसेवक फारुक जमादार, माजी नगरसेवक किरण बोकन, भिमदलचे जिल्हाप्रमुख सुनिल भोसले,राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष हणुमंत मांढरे पाटील बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते आण्णासाहेब सुपनवर,भिमक्रांती दलचे शहाजी धेंडे, शिवसेना विभाग प्रमुख अविनाश गाडे, आदिंनी पाठिंबा दिला.
भुमीअभिलेख विभागाचे उपअधीक्षक यांनी परवा दिवशी सर्व तक्रारदारांसोबत बैठक घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने व आज भुमापन दिन असल्याने आम्ही दोन पाऊल मागे घेतले आहेत मात्र बुधवारी जर सकारात्मक तोडगा नाही निघाला तर तीव्र आंदोलन करू
- शाहुराव फरतडे,शिवसेना माजी तालुकाप्रमुख, करमाळा.