चिखलठाण मधील शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून १ लाख रुपयांचे साहित्य भेट
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : न्यू इंग्लिश स्कुल चिखलठाण (सद्याचे श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय) येथील दहावीच्या (एस.एस.सी) २००२-२००३ या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी दि. १६ एप्रिलला विद्यालयात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला १ लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाला या बॅचच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास असणारे शिक्षक श्री.पिसे सर,श्री.बारकुंड सर,श्री.कोटगुंड सर,श्री.कदम सर ,श्री.कांबळे सर,श्री.कांबळे ए. एस.,श्री.घोडके सर ,श्री.जाधव सर व पिसे मॅडम उपस्थित होते. या मेळाव्यासाठी हे सर्व शिक्षक गावात आले असताना सर्व माजी विद्यार्थी त्यांच्या स्वागतासाठी गावचे वेशीजवळ हजर झाले. तेथे सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. त्यानंतर हलगीसह गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेले हे स्वागत पाहून शिक्षकांचे हृदय गहिवरून गेले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास अहुजा संपूर्ण साऊंड सिस्टिम, डायस, शालेय वर्ग खोल्यांसाठी फॅन असे एक लाख रुपयांचे साहित्य भेट दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गुरुराज माने हे होते. संदीप बारकुंड (अध्यक्ष,स्थानिक स्कूल कमिटी) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलकंठ शिंदे व साईनाथ लोहार यांनी केले. स्वागत सचिन मराळ व आभार प्रदर्शन रूपचंद पवार यांनी मानले.