वीर पत्नी संगीता कांबळे यांचा दिल्ली येथे सन्मान – नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये दिली पतीला मानवंदना

करमाळा / संदेश प्रतिनिधी (सुरज हिरडे) : पोथरे (ता.करमाळा) येथील वीरपत्नी संगीता भारत कांबळे यांना दिल्ली येथील नॅशनल वॉर मेमोरियल येथे बोलावून सन्मान करण्यात आला. यावेळी शहीद भारत कांबळे यांना मानवंदना देण्यात आली.
भारताच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत विविध युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीसाठी भारत सरकारद्वारा दिल्ली येथील इंडिया गेटच्या जवळ ४० एकर एरियामध्ये नॅशनल वॉर मेमोरियल तयार करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत विविध युद्धामध्ये २६ हजारांपेक्षा जास्त जवान शहीद झालेले आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिल्ली येथील नॅशनल वॉर मेमोरियला बोलावून त्यांच्या समवेत त्या त्या शहीद जवानांना मानवंदना दिली जात आहे.

अशाच प्रकारे शहीद भारत कांबळे यांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या पत्नी संगीता कांबळे यांना काल (दि.२० एप्रिल) रोजी बोलविण्यात आले होते. सायंकाळी ६ च्या दरम्यान अमर जवान ज्योती या स्मारकाला त्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी जवानांच्या तुकडीने परेड करत मानवंदना दिली. याच ठिकाणी त्याग चक्र ह्या विभागात प्रत्येक शहीद जवानाचे नाव, त्यांची रँक व रेजिमेंट एका भिंतीवर ग्रॅनाईट फरशीवर कोरलेले आहे. तिथे वीरपत्नी कांबळे यांनी पुष्प अर्पण केले. या कार्यक्रमाला सशस्त्र दलाचे काही जवान व काही नागरिक उपस्थित होते.
संगीता भारत कांबळे या पोथरे (तालुका करमाळा) येथील असून त्यांचे सासर बीड जिल्ह्यातील अंमळनेर (ता.पाटोदा) हे आहे. १९९६ मध्ये त्यांचे लग्न शहीद भारत कांबळे यांच्याशी झाले. सद्या त्या पोथरे येथे आपल्या माहेरी राहत असून घरची शेती बघत आहेत. त्यांना विक्रम हा मुलगा असून तो सध्या कोल्हापूर येथे नोकरी करत आहे. श्रीमती कांबळे यांनी अडीच वर्षे पोथरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी देखील काम केले आहे.
शहिद लान्स नाईक भारत कोंडीबा कांबळे हे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. १९९८ मध्ये ते त्यांच्या तुकडीसह जम्मू काश्मीर मध्ये ऑपरेशन रशद साठी गेले होते. २ एप्रिल १९९८ रोजी शत्रू सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत शत्रू सैन्याकडून त्यांच्या सैन्य वाहनावर हल्ला करण्यात आला. यामध्ये लान्स नाईक भारत कांबळे गंभीर जखमी होऊन शहीद झाले.
नॅशनल वॉर मेमोरियल कडून वीर पत्नी म्हणून माझा जो सन्मान केला हे पाहून मी भारावुन गेले. माझ्या आयुष्यातील हा संस्मरणीय दिवस होता. माझे पती देशासाठी शहीद झाले. माझ्या पतीचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.
वीर पत्नी संगीता कांबळे





