‘दहिगांव’ योजनेतील टेलच्या टप्यातील गावांना आवर्तन मिळत नसल्याने २६ एप्रिलला आंदोलनाचा इशारा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘दहिगांव’ उपसा सिंचन योजनेतील टेलच्या टप्यातील गावांना सध्याचे उन्हाळी आवर्तन मिळत नाही, या भागातील शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत, त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून सबंधीत अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देऊन आम्हाला न्याय मिळवून दयावा, अन्यथा उद्या उद्या २६ एप्रिलला सकाळी ९ वा.सालसे (ता.करमाळा) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, करमाळा तालूक्यातील पूर्वभागासाठी विकासाची गंगोत्री असणाऱ्या दहिगांव उपससिंचन योजनेचे सध्या उन्हाळी आवर्तन चालू आहे. प्रत्येक आवर्तनाचे पाणी टेल टू हेड या नियमानुसार पूर्ण करणे अपेक्षीत असताना योजनेच्या टेलच्या भागातील वरकुटे, आळसूंदे, सालसे, साडे, घोटी, निंभोरे, मलवडी या गावातील शेतीसाठी १९ एप्रिलपासून उन्हाळी आवर्तन सुरू केलेले असूनही आजपर्यंत एक थेबंही पाणी मिळालेले नाही. सदयस्थितीचा विचार केला असता सदर योजनेच्या मुख्यकालव्यावरून व पहिल्या टप्यातील कालव्यावरून सायफन व इलेक्ट्रीक मोटारीव्दारे अनधिकृतपणे पाण्याचा बेसुमार उपसा चालू असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतीला पाणी उपलब्ध होत नाही.

मुख्य कालव्यावरून होणा-या बेसुमार अनधिकृत पाणी उपसा बदं करणे विषयी संबंधीत अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करुनही जाणीवपूर्वक व हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत. तेव्हा कृपया आपण या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सबंधीत अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देऊन आम्हाला न्याय मिळवून दयावा. अन्यथा उद्या उद्या २६ एप्रिलला सकाळी ९ वा.सालसे (ता.करमाळा) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर शेतकऱ्यांनी सह्या केल्या असून त्याच्या प्रति दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उपभियंता, करमाळा तहसीलदार, तसेच करमाळा पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत.