करमाळा तालुक्यातील 5761 शेतकऱ्यांना 24 कोटी 75 लाख अनुदान वितरित –
आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जात असतात, या योजनांचा लाभ करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतलेला असून, तालुक्यातील एकूण 5761 शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांमधून 24 कोटी 75 लाख अनुदान वितरित झाले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सन 2021- 22 ते 22 – 23 या 2 वर्षांमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत 30 लाख 44 हजार ,राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत 40 लाख 95 हजार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत 11 कोटी 38 लाख 82 हजार, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत 2 कोटी 18 लाख 86 हजार, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2 कोटी 94 लाख 96 हजार ,कृषी यांत्रिकी उपअभियानांतर्गत 2 कोटी 7 लाख 94 हजार ,राष्ट्रीय कृषी विकास योजना यांत्रिकीकरण अंतर्गत 2 कोटी 48 लाख 76 हजार, राष्ट्रीय कृषी विकास योजना – कांदा चाळ या अंतर्गत 1 कोटी 87 लाख 31 हजार, राष्ट्रीय कृषी विकास योजना शेततळे अस्तरीकरण साठी 1 कोटी 7 लाख 64 हजार, राष्ट्रीय कृषी विकास योजना संरक्षित शेतीसाठी 1 कोटी 66 लाख 81 हजार, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक क्षेत्रासाठी 75 हजार असे एकूण 24 कोटी 75 लाख अनुदान आतापर्यंत वितरित झाले असून, या कामी कृषी अधिकारी संजय वाकडे यांचे कार्य महत्त्वाचे असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा – तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे
केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाडीबीटी पोर्टल द्वारे विविध योजनांसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करत असतात .एकाच अर्जाद्वारे विविध योजनांसाठी ते आपली मागणी नोंदवू शकतात .या विविध योजनांचा लाभ तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे.