वादळी वाऱ्यात उमरड येथे प्रचंड नुकसान – घरावरील पत्रे उडाले तर शेतातील केळी, पोपई भुईसपाट..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आज (ता. २७) दुपारी दोन वाजता आलेल्या चक्रीवादळात उमरड ( ता. करमाळा) येथे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये घरावरील पत्रे उडाले असून शेतातील पोपई, केळी भुईसपाट झाली आहेत. याशिवाय शेतातील अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

उमरड येथे दुपारी दोन वाजता झालेल्या वादळात मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. यात एक झाड उन्मळून म्हशीच्या अंगावर पडले आहे. शेतातील केळी, पोपईच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत. गावातील रामदास बदे, रघुनाथ बदे, गौतम कदम, कय्युम शेख आदीच्या घरावरील पत्रे उडून घराचे नुकसान झाले आहे. शिवाय पत्रे उडून गेल्याने घरात पाऊस पडल्याने आतील वस्तूंचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी दिले आहे.

