शेटफळ परिसरातील केळीच्या पिकाचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान - भरपाईची शेतकऱ्यांची मागणी.. - Saptahik Sandesh

शेटफळ परिसरातील केळीच्या पिकाचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान – भरपाईची शेतकऱ्यांची मागणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) परिसरातील शेटफळ, केडगाव, चिखलठाण, कुगाव परिसरात शुक्रवारी (ता.२८) दुपारी अडीच वाजता अर्धा ते पाऊण तास मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की, परिसरातील अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले. रस्त्याच्या कडेवर असणारी अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने ठिक-ठिकाणी रस्ते बंद झाले होते. अनेक ठिकाणी विजेचे खांब मोडून पडल्याने विजपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

शेटफळ येथील बाबुराव सरकाळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या आर्थिक नुकसान झाले आहे, सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवित हानी झाली नाही. शेतातील केळी पिकाला या वादळी वाऱ्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. चिखलठाण येथील विशाल गव्हाणे समाधान गव्हाणे सुनील चव्हाण, अवधुत सुरवसे, कुगाव येथील महेश कोकरे, विजय कोकरे, शेटफळ येथील हर्षाली नाईकनवरे, हंबीरराव नाईकनवरे राजेंद्र पोळ, सुधीर घोगरे, विष्णू निंबाळकर, कैलास लबडे, दत्तात्रय गुंड,जोतीराम डीगे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या येण झालेल्या व काढणीसाठी जवळ आलेल्या केळी बागा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे वाऱ्याने आंब्याची झाडे उन्मळून पडली तसेच उभ्या झाडावरील कच्चे आंबे खाली पडून झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला होता अनेक लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने बेघर होण्याची वेळ आली आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी लोकांमधून केली जात आहे.

माझ्या पाऊणे दोन एकर केळी पिकामधील एक हजार पेक्षा जास्त केळीची झाडे वादळी वाऱ्याने पडलेली आहेत, गेल्यावर्षीसुद्धा वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले होते, दरवर्षी वादळी वाऱ्याचा फटका केळी पिकाला बसतोय, यामुळे अडचणी आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरपाईची मदत केली पाहिजे. – हर्षाली नाईकनवरे (केळी उत्पादक शेतकरी शेटफळ)

माझी चार एकर केळीची बाग काढणीला आली होती . व्यापारी येऊन पाहून गेले होते दोन दिवसांत जाणार होती ती आता संपुर्ण झोपली आहे वादळी वाऱ्याने पडलेला केळीचा माल व्यापारी घेत नाहीत त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. – विशाल गव्हाणे (केळी उत्पादक शेतकरी चिखलठाण)

वादळी वाऱ्यांमुळे केळी पिकाचे नुकसान होणे ही गोष्ट दरवर्षी होते मुलाप्रमाणे जपलेल्या सोन्यासारख्या पिकाचे डोळ्यासमोर मोठे नुकसान होते परंतु शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत मिळावी. – वैभव पोळ (तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ)

आज झालेल्या वादळी वाऱ्याने माझ्या घरावरील सर्व पत्रे उडून गेले आहेत सुदैवाने आणि आमचा जीव वाचला सध्या आम्ही उघड्यावर आलो असून आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने आम्हाला द्यावी. – बाबुराव सरकाळे, (शेटफळ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!