ठरवून नियोजन व अभ्यास केल्यास यश मिळते – डाॅ.शुभांगी पोटे-केकाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ठरवून नियोजन व अभ्यास केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळते,त्यासाठी प्रत्येकांनी ध्येय ठरवून कामाला लागावे,असे आवाहन आयएएस परीक्षेत करमाळ्याचे नाव उज्वल करण्याऱ्या पहिल्या युवती डाॅ.शुभांगी पोटे-केकाण यांनी केले.

येथील यशकल्याणी संस्था, ग्रामसुधार समिती, ज्ञानज्योती महिला संस्था, वंजारी महासंघ, अंधश्रद्ध निर्मुलन समिती,क्षितिज ग्रुप, यासह अन्य सामाजिक संस्थाच्यावतीने त्यांचा सन्मान सोहळा येथील यशकल्याणी भवन मध्ये आयोजन करण्यात आला होता. त्यावेळी त्या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या.

पुढे बोलताना डॉ.पोटे-केकाण म्हणाल्या की, माझी निवड झाल्यानंतर अनेक विवाहित महिलांचे फोन आले. विवाहानंतरही यश मिळू शकते याचा त्यांना आनंद झाला आहे. खरंतर योग्यप्रकारे प्रयत्न केलेतर यश मिळत असते.मी कोणत्याही क्लास शिवाय यश मिळवले. मला माझ्या परिवारांने दिलेले पाठबळ व सहकार्य यामुळे इतपर्यंत पोहोचले. माझे पती यांनी केलेले मार्गदर्शन व दिलेली साथ मला महत्त्वाची ठरली आहे. पालकांनी मुलावर आपले विचार न लादता, त्यांच्या आवडीला प्रोत्साहन द्यावे असेही डॉ. पोटे-केकाण म्हणाल्या. हा कार्यक्रम ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाला. यावेळी यशकल्याणी संस्थेच्या वतीने शाल,भक्तीशक्तीची प्रतिमा,मानपत्र व गुलाबांचा हार देऊन विशेष सन्मान केला.

करमाळ्याच्या प्रगतीचा आलेख उंचावर नेण्याचे काम डाॅ.शुभांगी पोटे-केकाण यांनी केले आहे. तालुक्यातील पहिल्या महिला आयएएस होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीला त्यांचा सत्कार करताना आम्हास आनंद होत आहे.त्यांचे यश हे पुढील पीढीला प्रेरणादाई ठरणार आहे. आज विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिल्याने त्यांचे कर्तृत्व सिद्ध होत आहे.
– प्रा.गणेश करे-पाटील ,अध्यक्ष-यशकल्याणी संस्था,करमाळा.

यावेळी प्रा.लक्ष्मण राख,मुख्याध्यापिका शितल वाघमारे, प्राचार्य डॉ. प्रविण देशमुख,तहसीलदार विजय जाधव, आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अक्रूर शिंदे व ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले. स्वागतगीत शिक्षक लष्कर यांनी केले तर आभार प्रा. प्रदीप मोहिते यांनी मानले.यानंतर विविध व्यक्ती व संस्थेमार्फत डाॅ.शुभांगी पोटे-केकाण यांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सयाजीराजे ओंबासे,अनिल माने,दादासाहेब पिसे , संतोष माने,बाळासाहेब दुधे,गजेंद्र पोळ,प्रशांत नाईकनवरे,
दोस्ती बॅण्ड चे कुरेशी,प्रफुल्ल दामोदरे पांडे येथील हलगी पथक भिवा वाघमोडे,विक्रम राऊत, शहाजी मोहोळकर,नवनाथ मोहोळकर, तात्यासाहेब ढाणे,रशिदभाई बागवान,सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे,बोधे गुरूजी,प्राचार्य संभाजी जगताप,ग्रामविकास अधिकारी स्वाती माने,सचिन काळे,नागादादा केकान,हनुमंत सरडे,अजितकणसे,संतोष शितोळे,प्रा जयेश पवार,अनिल बदे महिला प्रतिनिधी- ज्ञानज्योती महिला ग्रुपच्या अनिताताई राऊत,निशिगंधा शेंडे यांचे योगदान लाभले.
