श्री कमलाभवानी मंदिराच्या जिर्णोधारासंदर्भात सहविचार सभा संपन्न..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.१३) : करमाळा शहराचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिराच्या कालानुरूप होत असलेल्या पडझडीवर डागडुजी करण्याची गरज असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या भव्य दिव्य वास्तुचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट, श्रीदेवीचामाळ यांनी ११ जुन रोजी ट्रस्ट सदस्य, श्री देवीचामाळ ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सर्व भक्त परीवार आणि प्रतिष्ठित मान्यवरांची सहविचार सभा आयोजित केली होती. या सभेत सर्व स्तरांतील भक्तांच्या उपस्थितीत जीर्नोधाराबाबत विचार विनिमय होऊन विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्टचे सचिव अनिल पाटील यांनी सांगितले की, मंदिराचे शिखर ९६ खांबावर, ९६ ओवऱ्यावर आधारलेले मंदिर आणि समोरच असणाऱ्या दिपमाळा कालानुरूप कमकुवत होत आहेत. गेली वर्षभर संस्थेचे अध्यक्ष, सचिव व विश्वस्त यांनी प्राचिन व पुरातन कामाच्या संवर्धन कार्यपध्दतीची परराज्यासह पुणे, रायगड, भोर, नाशिक इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने भेटी देऊन माहिती घेतलेली आहे व प्रत्यक्ष जाऊन पाहणी व निरीक्षण केलेले आहे. ही कामे गडकिल्ले, मंदिरे, व युनेस्कोच्या जतन व संवर्धन कामाचा अनुभव असलेले नाशिक येथील वास्तु विशारद श्री. वरुण भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहेत. त्यामुळे श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्टने भांबरे यांना श्री कमलाभवानी मंदीराच्या जतन व संवर्धन या कामासाठी नियुक्त केलेले आहे.
भांबरे यांनी मंदिराच्या कामाची इत्यंभूत निरीक्षणे झाल्यानंतर कोण कोणत्या घटका पासुन मंदिराचे प्लास्टर काम केलेले आहे, याचे पृथ:करण करुन त्यांनी मंदिराचे शिखर, दिपमाळ आणि वेगवेगळ्या दगडी कामाचे नकाशे तयार केलेले आहेत. या सर्व कामाचे डेमो भांबरे यांनी उपस्थितांना प्रत्यक्ष आणि डिजिटल प्रक्षेपनाद्वारे दाखवून सर्वांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितले. श्री. भांबरे यांच्या म्हणण्याप्रमाणे आता केलेले काम हे यापुढे ३०० ते ३५० वर्षे टिकणारे असणार आहे. हे काम लोकसहभागातून होणार असल्याने मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी ट्रस्ट सदस्यांकडून प्रत्येकी एक लाख रुपये देणगीची घोषणा करण्यात आली. यासोबतच मंदीराचे पुरोहित सुशील पुराणिक यांनी एक लाख रुपये देणगीची घोषणा केली आहे.
या बैठकीला वरिष्ठ न्यायाधीश राजेंद्र काकानी, संजय पवार (उपजिल्हाधिकारी, पुणे), उद्योजक राजेंद्र पवार, श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, विश्वस्त डॉ. नगरे, डॉ. प्रदीपकुमार जाधव, सुशील राठोड, प्रशासन अधिकारी महादेव भोसले,विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे, जेष्ठ पत्रकार विवेक येवले, महेश चिवटे, नासीर कबीर, टायगर ग्रुपचे डॉ. तानाजी जाधव, ॲड. राहुल सावंत, अशोक गाठे, संभाजी होनप, दत्ता रेगुडे, श्री देवीचा माळ ग्रामपंचायत सरपंच महेश सोरटे, उपसरपंच प्रतिनिधी दीपक थोरबोले, सदस्य, पुजारी, पुरोहित, सेवेकरी, मानकरी, ग्रामस्थ, शहर व तालुक्यातील बहुसंख्य श्री कमलाभवानी भक्त उपस्थित होते.