पहाटेच वृद्ध महिलेला मारहाण करून सोन्याचे मनी व कुडले अज्ञात चोरट्यांनी चोरले – केतुर क्र २ मधील घटना
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – पहाटे झोपेत असताना दोन अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेला मारहाण करून गळ्यात घातलेल्या काळया मन्यात गुंफलेले सोन्याचे मनी व एका बाजूचे कानातील सोन्याचे कुडके चोरून नेले असे एकुण 35000 रूपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढुन नेला. ही घटना २३ जुन रोजी पहाटे केतुर क्र.२ (ता.करमाळा) येथे घडली. यामध्ये दोन अज्ञात चोरांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
नितीन शिवाजी देवकते (नातू) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमच्या घराच्या समोर पत्रा शेड मारला असुन माझी आजी माझीआजी गोपाबाई मल्हारी देवकते (वय ७९) तिथे राहण्यास आहे.दिनांक २३ जून रोजी पहाटे सव्वा २ वा. सुमारास ग्रामपंचायत नळाला आलेले पाणी बंद झाले होते. गल्लीतील सर्व लोक पाणी भरत होते. आई देखील पाणी भरत होती. त्यावेळी आजी गोपाबाई ही समोरील शेड मध्ये झोपली होती. माझे आई व वडील असे दोघे दुसरे रूम मध्ये झोपले होते. मी शेजारील रूम मध्ये झोपलो होतो. पहाटे पावणेतीन वा सुमारास माझी आजी दरवाजा वाजवत होती. त्यावेळी मी व माझे वडील, आई असे उठलो दरवाजा उघडला असता आजीच्या डोक्यातुन रक्त येत होते.
त्यावेळी मी व माझी आई, वडील यांनी आजीस काय झाले असे विचारले असता आजीने सांगितले कि, “पत्रा शेड मध्ये झोपले असता दोन अनोळखी लोक रात्रीचे वेळी आले त्यापैकी एकाने माझ्या अंगावर बसुन नरडे दाबले होते, त्याच्या सोबत दुसऱ्या माणासाने माझ्या गळयातील सोन्याचे मनी काळया मन्यात गुंफलेले जबरदस्तीने ओढून घेतले व कानातील एका बाजचे सोन्याचे कुडके ओढुन काढले दुसरे बाजुचे कानातील कुडके निघाले नाही त्याच चोरटयाने जवळ असलेल्या दगडी जात्याचे तुकडयाने डोक्यात व तोंडावर मारहाण केली आहे ” असे सांगीतले त्यानंतर आम्ही आजीला तू त्यांना ओळखते का असे विचारले असता तिने सांगीतले की, मी त्यांना पाहील्यास ओळखू शकेन.
आजीच्या डोक्यातून रक्त येत असल्याने मी गांवातील डॉ. रॉय यांना घरी आणले त्यांनी इंजेक्शन व गोळया दिल्या. आमच्या घराचे शेजारील लोक जागे झाले. त्यांनी व आम्ही मिळुन दोन चोरटयाचा गावात व परिसरात शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत. त्यानंतर सकाळी 6 वा सुमारास झाले प्रकार बाबत करमाळा पोलीस ठाणेचे बारकुंड पोलीस यांना कळविले, बारकुंड पोलीस व पोलीस पाटील तात्काळ घरी आले. त्यांनी अॅम्बुलन्स बोलवुन माझे आजीला पुढील उपचारा करीता कॉटेज हॉस्पीटल करमाळा येथे माझे वडीलांसोबत पाठवून दिले. याविषयी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर करत आहेत.