"मी एक दिवस जीव देणार आहे" असे वडिलांशी केलेले वक्तव्य महिलेने खरे केले - निंभोरे येथील घटना - Saptahik Sandesh

“मी एक दिवस जीव देणार आहे” असे वडिलांशी केलेले वक्तव्य महिलेने खरे केले – निंभोरे येथील घटना

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – “नवऱ्याच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून मी एक दिवस जीव देणार आहे” असे वडिलांशी केलेले वक्तव्य महिलेने खरे केले. मृत्यूनंतर तिच्या पाठीवर लालसर व्रण व दोन्ही हाताला खरचटलेले होते.

सुमारे गेल्या पाच वर्षांपासून नवरा सतत दारू पिऊन मारहाण करत असल्याने त्याच्यासोबत राहणे असह्य झाल्याने निंभोरे (ता. करमाळा) येथील महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केलेली आहे. विजया महावीर मारकड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात महिलेचे वडील उल्हास शंकर लांडगे (वय ६४) रा. म्हसोबा रुई ता. माढा जि. सोलापुर यांनी करमाळा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली आहे. विजया मारकड या निंभोरे ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या. नुकताच त्यांचा कार्यकाल संपला होता.

दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, माझी मुलगी विजया हीचे माझा भाचा महावीर साहेबराव मारकड रा. निंभोरे (ता. करमाळा) याच्या सोबत गेले १६ वर्षां पुर्वी लग्न झाले होते. तिला १४ वर्षांचा मुलगा व १२ वर्षांची मुलगी आहे. जावई महावीर मारकड हा व्यसनी असून सतत दारू पिऊन येऊन मुली बरोबर भांडण करत तिला मारहाण करत होता.

माझी मुलगी विजया फोनवरून तसेच गावाला आमच्याकडे आल्यानंतर, नवरा व्यसन करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे आम्हाला सांगत होती परंतु तो बहीणीचा मुलगा असल्याने व तिचा संसार मोडू नये म्हणून आम्ही तिला समजावून सांगत होतो. त्याची आई ही माझे मुलीस मारहाण करीत असताना सोडविण्यास जात होते त्यावेळी देखील तो आईस देखील माराहण करीत होता. मागील दोन वर्षांपूर्वी अशाच मारहाणीत मुलीच्या डाव्या पायाच्या नडघीवर मारहाण केली त्यात पाय फ्रॅक्चर झाला होता. माझी बहीणीस माझे जावई सतत मारहाण करीत असल्याने माझी बहीण देखील पाच वर्षांपासून माझ्या कडेच राहण्यास आली.

माझ्या मुलीचा गेले एक वर्षा पुर्वी मोबाईल खराब झाल्याने तिचा फोन येणे बंद झाले होते. २४ जून २०२३ ला मी तिला भेटण्यासाठी गेलो असता तिने नवरा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे सांगितले.मला त्यासोबत रहावयाचे नाही, तो मला त्रास देत असल्याने मी एक दिवस जीव देणार आहे असे म्हणाली होती. त्यावेळी मी तिला मुलांकडे बघून नांदले पाहिजे असे म्हणून समजावून सांगितले व भाचाला देखील भांडण करू नका म्हणून समजावून सांगितले व घरी आलो.

दिनांक २ जुलै रोजी देखील परत मुलीने नवऱ्याच्या फोनवरून मला फोन करत नवरा दारू पिऊन सकाळी व दुपारी मारहाण केली असे सांगितले. त्यावेळी मी मुलीस तु काही त्याला बोलु नको उदया मी व तुझी आई असे दोघे निंभोरे येथे येतो असे सांगितले होते.त्यानंतर ३ जुलैला दुपारी ३ वाजता माझे थोरले जावई यांनी मला फोन करून विजया हिने विषारी औषध पिले असून तिला करमाळा येथील दवाखान्यात नेले असल्याचे सांगितले.त्यानंतर दवाखान्यात पोहोचलो असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या शारीरिक तपासणीत तिच्या पाठीवर लालसर व्रण दिसले. दोन्ही हाताला खरचटले होते.

मुलगी नात्यामध्ये दिली असल्याने आम्ही आमच्या जावया विरूध्द यापुर्वी कोठे तक्रार केली नव्हती. तक्रार दिल्यास मुलीचा संसार मोडेल व मुलीस जावई सांभाळणार नाही म्हणुन तक्रार कोठे दिली नाही असे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

जावई महावीर मारकड याने मुलगी विजया हिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद महिलेचे वडील उल्हास शंकर लांडगे यांनी दिली. याविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धर्मा साने हे करत आहेत. यात पतीला अटक केली असून एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

संपादन – सुरज हिरडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!