केमचे सुपुत्र तहसीलदार विजय तळेकर यांचा पनवेल मध्ये निरोप समारंभ संपन्न
केम : (प्रतिनिधी – संजय जाधव) – केम (ता.करमाळा) गावचे सुपुत्र व पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची वैद्यकीय कारणास्तव बदली झाली आहे. एप्रिल महिन्यामध्ये वैद्यकीय कारणास्तव स्वतःची बदली व्हावी यासाठी शासनाकडे त्यांनी विनंती केली होती. त्यांच्या कार्यकालाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (४ जुलै) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पनवेल तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना श्री.तळेकर म्हणाले की, मी काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही ही बाब कटाक्षाने पाळली. कार्यालयात येणाऱ्यांचे काम पूर्ण होईपर्यंत प्रयत्न केले. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना दाखले देण्यासाठी प्रयत्न केले. कामादरम्यान वरिष्ठांचे मला नेहमीच सहकार्य मिळाले.
याप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे प्रांताधिकारी राहुल मुंडके, नवनियुक्त तहसीलदार विजय पाटील खानापूर व अलिबागचे तहसीलदार शितल तळेकर, शिवतेज, शार्विन तळेकर आदी उपस्थित होते.
विजय तळेकर हे केम येथील कै. शिवाजी बापू तळेकर यांचे चिरंजीव आहेत. ते एका शेतकरी कुटुंबातील असून 2011 साली एम पी एस सी परीक्षेद्वारे नायब तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी दोडामार्ग,मुरबाड,अंबररनाथ, येथे नायब तहसीलदार म्हणून काम केले आहे. 2018 साली बांद्रा येथे तहसीलदार म्हणून उल्लेखनीय काम केले. 24 डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी पनवेल तहसीलचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी एग्रीकल्चर मध्ये पदवी घेतली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव झालेला आहे.
याप्रसंगी झालेल्या निरोप समारंभामध्ये विजय तळेकर हे सेवानिवृत्त होईपर्यंत पनवेल मध्येच रहावेत अशी जनभावना होती. लोकांचे काम हे आपले काम अशीच त्यांची तळमळ असायची भविष्यात ते आणखीन उच्च पदावर राहतील असे मत रामनाथ शेठ ठाकूर (माजी खासदार) यांनी व्यक्त केले.
त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक प्रशासकीय आदी यंत्रणांमध्ये मा. तळेकर यांनी उत्तम समन्वय राखला पनवेल सारख्या शहराची जबाबदारी अत्यंत लिलया सांभाळली असे मत प्रीतम म्हात्रे (माजी विरोधी पक्षनेते) यांनी व्यक्त केले.
- विजय तळेकर यांच्या कार्याचा लेखाजोखा :
- गेली आठ वर्षे बंद असलेल्या पनवेल मधील शासकीय इमारतीच्या कामाला चालना
- कोविड काळात रुग्णालय व ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्या यांच्यात उत्तम समन्वय ठेवून वैद्यकीय सुविधा पुरविल्या
- नैसर्गिक आपत्तीमध्ये शासकीय व लोकसहभागातून आपदग्रस्तांना मदत
- आदिवासी व कातकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या दाखल्यांचे वाटप
- जात पडताळणी कॅम्पद्वारे त्याच दिवशी लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न
- तालुका विधी प्राधिकरण अंतर्गत विविध शिबिर
- दोन नवीन तलाठी कार्यालयांची चावडी बांधली सातबारा संगणकीकरणामध्ये शेतकऱ्यांना मोफत सातबारा
- कोविड काळात पती गमावलेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ
- वंचितांना निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिका मिळवून दिल्या.