पीक विमा भरण्यासाठी फक्त १ रूपया द्या – कृषी अधिकारी संजय वाकडे
करमाळा : सध्या शेतकऱ्यांच्या पीक विमा भरण्यासाठी सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी असून, शेतकऱ्यांकडून संबंधित सीएससी धारक जादा पैसे घेत आहेत; अशी तक्रार माहिती अधिकार प्रतिनिधी दादा परबत राऊत (रा.पोंधवडी) यांनी केली होती.
याबाबत तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी तात्काळ सीएससी केंद्रावरती भेट देऊन संबंधितांना शेतकऱ्यांकडून फक्त १ रूपया घेऊन पीकविमा फॉर्म भरावा. सदरच्या अर्जासाठी शासनाकडून सीएससी केंद्रास ४० रू. मिळणार आहेत. जर कोणाही सीएससी धारकाने जादा पैसे मागितल्यास कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी; असेही आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी केले आहे. याप्रसंगी कृषी विभागाचे उमाकांत जाधव व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
करमाळा शहर व तालुक्यातील सीएससी धारक पीक विमा भरण्यासाठी जादा रक्कम मागत होते. त्यामुळे मी कृषी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी उमाकांत जाधव यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित सीएससीधारकांना एक रूपयापेक्षा जादा पैसे घेऊ नयेत अशा सूचना केल्या आहेत. कोणाही शेतकऱ्याने पीक विमा भरताना १ रू. पेक्षा जादा रक्कम देऊ नये. … दादा परबत राऊत (सामाजिक कार्यकर्ते पोंधवडी)