हिशोबाची मागणी केल्यावरून चौघांकडून एकास मारहाण
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : गावातील महादेव मंदिरात फरशी बसविण्याच्या कामासाठी वर्गणी मागितल्यानंतर संबंधितांनी पूर्वीचा हिशोब द्या.. अशी मागणी केली असता, चौघांनी एकास लोखंडी रॉड व दगडाने चाकूने मारहाण केली आहे.
हा प्रकार १२ जुलैला सकाळी साडेनऊ वाजता कुंभरगाव येथे घडला आहे. या प्रकरणी बाळू विलास गलांडे रा. कुंभारगाव यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आमच्या गावात महादेव मंदिराचे नवीन बांधकाम झाले आहे. १२ जुलैला सकाळी साडेनऊवाजता मी मोटारसायकलवर कुंभारगाव एसटी स्टॅन्डजवळ आलो असता, मच्छिंद्र शंकर पानसरे याने मंदिरात फरशी बसविण्यासाठी ११ हजार रू. वर्गणी मागितली.
त्यावेळी मी म्हणालो.. मागच्या वर्गणीचा हिशोब द्या.. मगच मी वर्गणी देतो. त्यावेळी चिडून जाऊन मच्छिंद्र पानसरे यांनी लोखंडी रॉड माझ्या डोक्यात मारून मला जखमी केले. तर जालिंदर पानसरे यांनी माझ्या पाठीवर व तोंडावर दगडाने मारहाण केली. दशरथ पानसरे यांनी पायाच्या मांडीवर चाकूने मारहाण केली. तर दत्तात्रय पानसरे यांनी काठीने हात व पायाला मारहाण केली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.