स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट येथे मोफत होमिओपॅथी शिबीराचे आयोजन : भारतराव शिंदे-पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ देवस्थान समितीमार्फत स्वामी भक्तांसाठी व सर्वसामान्यांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसह समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, हे मोफत होमिओपॅथी शिबीर अक्कलकोट येथे शनिवारी 22 जुलै रोजी संपन्न होत असून, करमाळा तालुक्यातील मतीमंद गतीमंद मुलांसह पालकांनी शिबिरास उपस्थित रहावे व मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त भारतराव शिंदे पाटील यांनी केले आहे.
सदर होमिओपॅथी शिबीर हे नि:शुल्क असून मुंबई येथील डॉ. प्रफुल्ल विजयकर यांचे सहकारी डॉ.अपर्णा सामळ, डॉ. अंबरीश विजयकर, डॉ. तन्मय विजयकर यांचेसह डॉक्टरांचे विशेष पथक उपस्थित असणार आहे. देवस्थानच्या गाणगापूर रोडवरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात 20 वर्षाखालील मतिमंद गतिमंद मुलांसाठी होप फॉर होपलेस होमिओपॅथिक शिबिर हे शिबीर शनिवारी सकाळी 10 ते सायं. 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे तसेच स्वामी समर्थ देवस्थान समितीचे विश्वस्त भारतराव शिंदे-पाटील यांनी केले आहे.