चिखलठाण नं. १ येथील महाआरोग्य शिबीरात १३४० रूग्णांची तपासणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलठाण नं. १ येथे आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार, मोफत औषध वाटप शिबीरात एकूण १३४० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
या शिबीराचे आयोजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, चिखलठाण सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे, जाणता राजा मित्र मंडळ चिखलठाण तसेच शिवसेना वैद्यकिय कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांनी केले होते. या शिबीराचा संपूर्ण खर्च श्री. बारकुंड यांनी स्वत: केला आहे.
महाआरोग्य शिबीरामध्ये ७१८ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६३२ जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. चष्मे वाटपाचा संपूर्ण खर्च राजेंद्र बारकुंड यांनी केला. या शिबीरात ८६ नेत्ररूग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. तसेच ८५० लोकांचे विविध आजाराची तपासणी करून त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आले. तसेच २८ जणांची इसीजी काढण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांचे हस्ते झाले. यावेळी तहसीलदार विजय जाधव, गटविकास अधिकारी राजाराम भोंग, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, पत्रकार नासीर कबीर, उपअभियंता उबाळे, कुगावचे सरपंच सागर पोरे, सोगावचे सरपंच विनोद सरडे, चिखलठाण सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे यांचेसह गणेश कानगुडे, दिनकर सरडे, केरू गव्हाणे, इन्नुस सय्यद, कैलास बोंद्रे, गजेंद्र पोळ, नाईकनवरे महाराज, थोरात गुरूजी, समाधान गव्हाणे, महादेव कामटे, सतीश बनसोडे, अतुल जानभरे, प्रथमेश उंबरे, श्रीपाल गव्हाणे, हेमंत बारकुंड, डॉ. ब्रिजेश बारकुंड, डॉ. अक्षय गव्हाणे, राजेंद्र चव्हाण, रणजित गव्हाणे, विवेक जानभरे, सोमनाथ राऊत, सोन्या नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी अशाप्रकारचे शिबीर तालुक्यातील प्रत्येक गावात घेण्यात यावेत; अशी इच्छा व्यक्त केली. महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री व शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे वैद्यकिय फाऊंडेशन यांचे वतीने शिबीरासाठी औषधे दिली. तसेच पुढील गंभीर आजारावर मोफत उपचार करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. या शिबीराचे नियोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल राजेंद्र बारकुंड यांचे चिवटे यांनी विशेष कौतूक केले.
मुख्यमंत्रीचे विशेष कार्यकारी अधिकारी व वैद्यकिय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे सहकार्यातून करमाळा तालुक्यामध्ये सर्वसामान्य व गोरगरीब रूग्णांना मोफत रूग्णसेवा मिळत असल्याने चिवटे यांचे राजेंद्र बारकुंड यांनी विशेष कौतूक केले.
या आरोग्य शिबीरात चिखलठाण नं. १ व २, केडगाव, कुगाव, शेटफळ, दहिगाव, वांगी, सोगाव येथील नागरीकांनी सहभाग नोंदवला. तसेच उपजिल्हा रुग्णालय करमाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर, सुश्रुत हॉस्पीटल करमाळा चे डॉ. गायकवाड, ठाणे येथील डॉ. आहिरे व त्यांची टीम, सर्व आरोग्य सेवक, आशा वर्कर यांनी रूग्णांची तपासणी करून गोळ्या, औषधाचे वाटप केले. या शिबीराचे चांगले नियोजन केल्याबद्दल राजेंद्र बारकुंड यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हे शिबीर श्रीनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित केले होते.