कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो आवर्तन करमाळा तालुक्यासाठी सुरू… - Saptahik Sandesh

कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो आवर्तन करमाळा तालुक्यासाठी सुरू…


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कुकडी प्रकल्पातील डिंभे,माणिकडोह, येडगाव, वडज आदी धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरणे 50 टक्के पेक्षा अधिक भरली असून, त्यामधून विसर्ग सुरू आहे.त्यामुळे कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून करमाळा तालुक्यासह कर्जत, श्रीगोंदा तालुक्यासाठी ओहर फ्लो आवर्तन सुरू झाले असल्याची माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.


कुकडी प्रकल्प अंतर्गत असलेल्या धरण साखळीतील ओव्हरफ्लोवर सदर आवर्तन अवलंबून असणार आहे. हे आवर्तन 26 जुलैला सुरू झाले असून आज 2 ऑगस्ट रोजी करमाळा तालुक्यामध्ये हे पाणी प्रवेश करील. या ओव्हर फ्लो आवर्तनामधून प्रामुख्याने नुकतेच काम पूर्ण झालेल्या पोंधवडी चारी, या चारीच्या उपचाऱ्या यांची चाचणी घेतली जाणार आहे .या चारीसाठी किमान 5 दिवस हे पाणी सुरू राहील.


कुकडी प्रकल्प पूर्ण होऊनही पोंधवडी चारीचे काम मात्र अपूर्ण होते, आमदार संजयमामा शिंदे यांनी सदर कामासाठी 9 कोटी निधी मंजूर करून हे काम पूर्ण करून घेतल्यामुळे कोर्टीसह विहाळ, पोंधवडी, कुस्कर वाडी, राजुरी आदी गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. हुलगेवाडी व शितोळे वस्ती चारीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागालाही आवर्तन सोडण्यात येणार आहे.


पोंधवडी चारीसह या आवर्तनाचा लाभ मांगी तलावालाही होणार आहे. या तलावासाठी आजपासून पाणी सुरू झालेले आहे तसेच चिलवडी शाखा , कर्जत शाखेवर अवलंबून असलेल्या योजनेतील गावांना लवकरच या आवर्तनाचा लाभ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!