‘बिबट्या’ला पकडण्यासाठी वनविभागाने बसविला मांगी परिसरात पिंजरा – नागरिकांनी दक्ष राहण्याचा इशारा..
करमाळा (संदेश प्रतिनिधी) –
करमाळा : ४ ऑगस्ट रोजी मांगी परिसरात बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ आणि बातमी प्रसारित झाल्यापासून या परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली होती. वनविभागाच्यावतीने सतर्कतेचे आवाहन केले होते. परंतु आवाहनापेक्षा बिबट्याला पकडावे अशी नागरिकांची मागणी होती. प्रत्यक्षात ७ ऑगस्टला वनविभागाच्यावतीने सायंकाळी ६ च्या सुमारास बिबट्याला पकडण्यासाठी मांगीजवळ गट नंबर पाच मधील सचिन बागल यांच्या शेतातील रस्त्यावर पिंजरा बसवण्यात आला आहे.
यावेळी वनविभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, बाळासाहेब लटके, युवासेना जिल्हासचिव आदेशराव बागल,किरण बागल, दीपक बागल, विनोद नरसाळे पोलीस पाटील आकाश शिंदे, रोहित राऊत,अॅड. विश्वजीत बागल, प्रवीण भांडवलकर विकास नाना जाधव,आण्णा राऊत,समाधान कांबळे, आशुतोष बागल, दादा कोळी, श्री चव्हाण आदीजन उपस्थित होते.
४ ऑगस्टला सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मांगी येथील प्रितम माळी हे चारचाकीतून पोथऱ्याला लिंबे घालून मांगीकडे येत असताना रंदवे वस्तीजवळ बिबट्या पिकअप गाडीला आडवा गेला. त्यावेळी श्री माळी यांनी मोबाईल मध्ये शूटिंग घेतली. हा व्हीडीओ व्हायरल होताच या परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
मांगी, वडगाव, कामोणे, जातेगाव, पोथरे या भागातील लोकांमध्ये बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. कुणाची जीवित हानी होऊ नये म्हणून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवा अशी मी मागणी DFO पाटील साहेब यांना भ्रमणध्वनी द्वारे केली होती. ही मागणी मान्य झाली व प्रत्यक्षात पिंजरा बसविण्यात आला आहे. DFO, RFO साहेब यांचे युवा सेनेतर्फे व ग्रामस्थांतर्फे आभार.
– आदेशराव बागल, युवासेना जिल्हासचिव