फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक करा अन्यथा १४ ऑगस्ट पासून आमरण उपोषण - करमाळ्यातील महिलांनी दिला इशारा - Saptahik Sandesh

फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक करा अन्यथा १४ ऑगस्ट पासून आमरण उपोषण – करमाळ्यातील महिलांनी दिला इशारा

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : गोड बोलून आमच्या नावावर कर्ज काढून, त्या कर्जाची फेड न करता पळून जाणाऱ्या अश्विनी उदय भालेराव यांच्या विरूध्द विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही १४ ऑगस्टला तहसील कार्यालय समोर उपोषणास बसणार आहोत, असा इशारा करमाळा शहरातील १३ महिलांनी दिला आहे. या प्रकरणी १३ महिलांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना लेखी निवेदन दिले आहे.

मेघा कांबळे, साधना काळे, संध्या कुलकर्णी, संगीता वनारसे, पंकजा चोरमले, अश्विनी सावंत, अर्चना लोकरे, अस्मिता जवकर, शुभांगी वैकर, भाग्यश्री येवले, राजश्री गवळी, सुलोचना चोरमले, भारती लोकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र लेखी निवेदन देऊन आपण आमरण उपोषणास बसणार असल्याचे कळविले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे, की अश्विनी भालेराव हिने आम्हाला विविध बँक, पतसंस्था, मायक्रो फायनान्सद्वारे कर्ज वाटप करते असे म्हणून आमच्याकडून बँकांचे व पतसंस्थांचे फॉर्म भरून घेतले. एवढेच नाहीतर आमचे कर्जही मंजूर केले. मंजूर झालेले कर्ज स्वतःच घेऊन मी त्याचे हप्ते भरते, तुम्ही काही काळजी करू नका.. असे म्हणून आमच्या नावावर लाखो रूपयाचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी १० ते १५ टक्के रक्कम तिने भरलीही आहे. उर्वरित सर्व रक्कम व व्याज आम्हांस भरावे लागणार आहे. बँकांचा आमच्यामागे तगादा लागला असून, बँकांनीही आम्हाला न विचारता अश्विनी भालेराव हिच्या हातातच पैसे दिले.

अशाप्रकारे बंधन बँक, आयसीआयसीआय बँक, लोकमंगल पतसंस्था, ग्रामीण कुट्टा तसेच आयडीएफसी, श्रीराम पतसंस्था आदी संस्थातून आमच्या नावावर लाखो रूपये कर्ज घेऊन आमची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी पोलीसांकडे वारंवार फेऱ्या घालूनही पोलीस या प्रकरणी दखल घेत नाहीत. तसेच तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करत नाहीत. पूर्वी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यात तिचा अटकपूर्व जामीनही नामंजूर झाला आहे. तरीही

पोलीस तिला अटक करत नाहीत. अश्विनी भालेराव हिच्या विरूध्द आमच्या सर्वांचे गुन्हे दाखल होत नाही व तिला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत, असाही इशारा या महिलांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!