करमाळा ते श्रीदेवीचामाळ रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा ते श्रीदेवीचामाळ हा रस्ता उत्तम दर्जाचा झाला असून या रस्त्यावर वाहन चालक अतिवेगाने वाहने चालवत आहेत. यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक उभारावेत, अशी नागरीकांची मागणी आहे.
करमाळा ते श्रीदेवीचामाळ हा रस्ता रूंद व उत्तम दर्जाचा झाला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला वेगवेगळे व्यावसायिक बसलेले असतात. तसेच एका बाजुला कृष्णाजीनगर व दुसऱ्या बाजुला शाहुनगर अशी उपनगरे आहेत.
या भागातील नागरीक विशेषत: लहान मुले, महिला व वृध्द पुरूष सातत्याने वेगवेगळ्या कारणाने रस्त्यावर येतात. त्यावेळी अनेक तरुण आपल्या ताब्यातील वाहने बेफाम चालवतात. त्यातून अनेकदा अपघातही झाले आहेत. बहुतांशी लोक कमलादेवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने या भागात गतिरोधक उभारावेत, अशी नागरीकांची मागणी आहे.





