दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे - आमदार शिंदेंनी केली उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी - Saptahik Sandesh

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे – आमदार शिंदेंनी केली उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यासह एकूणच राज्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्या कारणामुळे विशेष बाब म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू करावे अशी आग्रही मागणी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे .

यावर्षी उजनी धरण मे महिन्याच्या प्रारंभीच उणे पातळीमध्ये गेल्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजना 6 मे 2023 च्या आसपास बंद पडली होती. या पावसाळ्यामध्ये 3 महिने उलटून गेले तरी अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या पट्ट्यातील हंगामी पिकांबरोबरच केळी ,ऊस यासारख्या बारमाही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे विशेष बाब म्हणून उजनी धरण अद्याप 33 टक्के भरलेले नसले तरीही दुष्काळी परिस्थितीचा विचार करता विशेष बाब म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे अशी आग्रही मागणी आ. शिंदे यांनी केली आहे.

उन्हाळ्यामध्ये उजनी धरण वजा 39 टक्के पातळीवरती गेले होते, यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये ते वजा पातळीतून उपयुक्त 13 टक्के पातळीवरती आले आहे .धरण 33 टक्के भरल्यानंतर आवर्तन सुरू करण्याचा प्रघात आहे.परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती विचारात घेता विशेष बाब म्हणून दहिगाव योजनेचे आवर्तन सुरू होणे आवश्यक आहे, कारण या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यावरती सौंदे, सरापडोह ,शेलगाव क, साडे , निंभोरे ,घोटी, गुळसडी, वरकटणे , कोंढेज आदी गावातील असंख्य शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केलेली आहे. या केळी पिकाचा खर्च लाखोंच्या घरात अल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर आ.संजयमामा शिंदे यांनी केलेली मागणी विशेष महत्त्वाची ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!