प्रा. डॉ. शिंदे यांचा जातेगाव ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : जातेगावचे सुपुत्र व भोसरी (पुणे) येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग प्रमुख पदावर कार्यरत असलेले प्रा. डॉ. हनुमंत शिंदे यांचा नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राष्ट्रीय सेवा योजनेतील भरीव कार्याबद्दल ४ ऑगस्ट रोजी ‘उत्कृष्ट संघनायक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर जातेगाव ग्रामस्थांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी प्रा. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच छगन सासणे, ग्रामविकास अधिकारी केवारे भाऊसाहेब, जि.प. प्रा. शाळेचे केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पोपट थोरात, ग्रामपंचायत सदस्य अचुत कामटे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद वारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक, आजी-माजी सैनिक, विद्यार्थी-पालक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
Related News : जातेगावचे सुपुत्र प्रा.डॉ. हनुमंत शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘उत्कृष्ठ संघनायक’ हा पुरस्कार देऊन केले सन्मानित
डॉ. हनुमंत शिंदे यांनी २०१६-१७ ते २०१९-२० या काळात राष्ट्रीय सेवा योजनेअंर्तगत विद्यापीठ पातळीवर पिंपरी-चिंचवड विभाग समन्वयक म्हणून व महाविद्यालय पातळीवर कार्यक्रम अधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केले. संघनायक म्हणून आळंदी – पंढरपूर रासेयो वारी, कोल्हापूर- सांगली महापूर आपत्ती व्यवस्थापन शिबिर, नदीस्वच्छता उपक्रम, कडुनिंबाच्या रोपांच्या वाटपासंदर्भातील गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या उपक्रमात विद्यापीठाचे नेत्रुत्व केले. तसेच रासेयो च्या नियमित कार्यक्रम व विशेष शिबिराच्या माध्यमातून वृक्षारोपण – वृक्षसंवर्धन, जलसंधारण व जलसंवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता अभियान, जनजागृती विषयक विविध उपक्रमांमध्ये सहभाग व अंमलबजावणी यामध्ये भरीव योगदान दिले. याचबरोबर डॉ. शिंदे यांनी कोरोना महामारीच्या काळात रासेयो स्वयंसेवकांच्या साहाय्याने कोरोना संदर्भात जनजागृती बरोबरच गरजू कुटुंबाना सॅनिटाझर , मास्क आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप यांसारख्या सामाजिक उपक्रमातून कोरोना संकटात लोकांना दिलासा देण्याचे काम केले.