शिवसेनेने उमेदवारी दिल्यास आपण विधानसभा लढवू : वैभवराजे जगताप
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून (ठाकरे गट) उमेदवारी मिळाल्यास आपण विधानसभा लढवू: असे करमाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व जगताप गटाचे युवा नेते वैभवराजे (आबा) जगताप यांनी सांगितले.
श्री.जगताप यांचे वाढदिवसानिमित्त ते सा.संदेशशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की करमाळा शहर व तालुक्यात आपण गेली २० वर्षापासून कार्यरत आहोत. करमाळा शहरात स्वयंस्फुर्तपणे प्रत्येक गल्लीत घराघरासमोर जावून स्वच्छता मोहिम राबवलेली आहे. सर्वसामान्यांबरोबर राहून आपण विविध उपक्रम व समाजपयोगी कामे केली आहेत, योगायोगाने लोकमतातून नगराध्यक्ष होण्याची संधी शहरवासियांनी दिली.
त्यानंतर करमाळा शहरातील अनेक समस्या सोडविल्या व पालिकेमार्फत सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे. आजही नगरपालिकेवर प्रशासक असतानाही आम्ही स्वखर्चाने वेगवेगळ्या ठिकाणाहून स्वच्छता कर्मचारी आणून स्वच्छता करत आहोत. तालुक्यातील प्रत्येक गावात लग्न समारंभ, वैयक्तीक कार्यक्रम, सामाजिक व राजकीय कार्यक्रम आदी कार्यक्रमात माझी हजेरी असते. याशिवाय संपूर्ण तालुकावासियांना माझा परिचय आहे. शहर व तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. करमाळा तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष ( ठाकरे गट) सक्षमपणे उभा राहत असून, प्रत्येक गावात शाखा उभारण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार घराघरात शिवसेना पक्षाचे विचार व धोरण पोहोचणार आहे.
महाविकास आघाडीतून करमाळा विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेला (ठाकरे गट) मिळणार आहे. त्यानुसार शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यास आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार नामदेवराव जगताप तसेच माझे पिताश्री माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा आदर्श समोर ठेवून तालुक्यात पुन्हा एकदा विकासाचे पर्व आणणार आहोत. तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा सेवा करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी. पद मिळाल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास आपण करू. पद असो नाहीतर नसो सर्वसामान्यांची सेवा करणे हा आमचा धर्म आहे, तो धर्म आम्ही कायम पाळत आलेलो आहोत व यापुढेही पाळत राहू.
… वैभवराजे जगताप (माजी नगराध्यक्ष)