मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची पूर्तता न झाल्यास मंत्रिमंडळातील नेत्यांना करमाळा तालुक्यात आम्ही फिरू देणार नाही – मराठा समाज आंदोलकांनी दिला इशारा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात झालेल्या हल्ल्याचा निषेध करून, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजाच्या मागणीची पूर्तता झाली नाही तर मंत्रिमंडळातील कोणत्याच नेत्यांना करमाळा तालुक्यात आम्ही फिरू देणार नाही, अशा प्रकारचे सकल मराठा समाजाच्यावतीने लेखी निवेदन व बांगड्याचा चुडा प्रशासनाला देण्यात आला. सदर निवेदन व बांगड्याचा बॉक्स प्रांतअधिकारी यांनी स्वीकारला.
आज (ता.६) करमाळ्यात सकाळी १० वाजता करमाळा शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी या मोर्चाला आमदार संजयमामा शिंदे यांनी पत्र पाठवून पाठिंबा जाहीर केला तसेच विविध संघटना, राजकीय नेते, करमाळा वकील संघ, व्यापारी तसेच सर्व सामान्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले तसेच अनेकांनी मराठा समाजाला पाठींबा दिला आहे. या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने युवकवर्ग सहभागी झाला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज करमाळा शहर बंद ठेवण्यात आले होते.
मराठा समाजाच्या मागणीमध्ये सराटा येथील आंदोलकांवर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला हे जाहीर करून सांगावे व दोषींवर कारवाई करावी तसेच मराठा समाजाला 50 टक्के आरक्षण जाहीर करावे व ओबीसी मधून आरक्षण मिळावे तसेच महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या विरोधात करमाळ्यातील आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशा पद्धतीचे विविध मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या व या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील कोणत्याच नेत्यांना करमाळा तालुक्यात फिरू देणार नाही असेही सकल मराठा समाजाच्यावतीने या निवेदनात म्हटले आहे
या मोर्चात युवकांनी विविध घोषणा देत, मराठा समाजाला आरक्षणाबाबत मागणी केली. याप्रसंगी करमाळा शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचाही मोठा बंदोबस्त उभा करण्यात आला होता. हा मोर्चा करमाळा शहरातील पोथरे नाका येथून निघून पुढे मुख्यरस्त्याने छत्रपती चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दत्त पेठेतून सुभाष चौक ते राशीन पेठ येथून हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे गायकवाड चौकातून मोर्चा तहसील कार्यालय येथे नेण्यात आला. पंचायत समिती समोरील मैदानात मराठासमाजाच्यावतीने ६ मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था बाजार समिती व तहसील कार्यालय परिसरात केली होती, हा मोर्चा शांततेत व्हावा यासाठी २० समन्वयक यांची नेमणूक केली होती, मोर्चेकरांसाठी पोथरे नाका व तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या मोर्चामध्ये कोठेही गोंधळ होऊ नये यासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी आपला पोलिसांचा ताफा करमाळा शहरातील प्रत्येक चौकात तैनात ठेवला होता.