24 सप्टेंबरला राज्यस्तरीय दूध परिषद व कृषी मेळाव्याचे आयोजन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – केळी उत्पादक संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथे येत्या रविवारी (दिनांक २४ सप्टेंबर) पहिली राज्यस्तरीय दूध परिषद व एक दिवसीय भव्य कृषी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती केळी उत्पादक संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष वैभव पोळ यांनी दिली.
पंढरपूर येथील संस्कार मंगल कार्यालय येथे 24 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता ही परिषद सुरू होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने-पाटील हे उपस्थित असणार आहेत.
राज्यातील दूध उत्पादकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी उपाययोजनावर चर्चा करण्यासाठी संघाच्या वतीने राज्यस्तरीय दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष वैभव पोळ यांनी केले.
करमाळा तालुका केळी उत्पादक संघाची कार्यकारणी जाहीर झाली असून तालुका अध्यक्ष पदी वैभव पोळ (शेटफळ ना), उपाध्यक्षपदी नंदू जाधव (हिंगणी), सचिवपदी वैभव बोराडे (केडगाव) कार्याध्यक्षपदी गणपत घोगरे (सरफडोह ) तर कार्यकारणी सदस्य पदी रोहित लबडे आजिनाथ साखरे अतुल भोसले सोमनाथ झोळ श्रीकांत पडवळ आजिनाथ गव्हाणे नितीन शेटे आदित्य बडे यांची कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.