निंभोरे येथील मुस्लिम बांधवांचा गणेशोत्सव उत्साही वातावरणात साजरा..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : निंभोरे (ता.करमाळा) येथील मुस्लिम बांधवांनी मिळून गणेश मंडळ स्थापन केले असून, त्यांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला. विशेष म्हणजे इतर ठिकाणी गणेश मंडळामध्ये एखादा मुस्लिम कार्यकर्ता असतो. मात्र निंभोरे येथील मुस्लिम बालगणेश भक्तांनी एकत्र येत एक स्वतंत्र “श्री बालगणेश मित्र मंडळ निंभोरे” या नावाने गणेश मंडळ स्थापन केले. या मंडळाचे हे पहिलेच वर्ष आहे.
हे मंडळ जुबेर पठाण, मुस्थपा मुलाणी, रियाज पठाण, रेहान पठाण, समीर नजीर पठाण, सोहेल पठाण, समीर युसब पठाण या बालगणेश भक्तांनी मंडळाची स्थापना केली. अगदी पारंपरिक पद्धतीने खूप छान असा देखावा करत या मुस्लिम बालगणेश भक्तांनी अगदी भक्ती भावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.
याप्रसंगी श्री गणेशाची आरती मंडळाने सामाजिक युवा कार्यकर्ते रवींद्र वळेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आर.व्ही ग्रुप चे अध्यक्ष पप्पू मस्के, दत्ताभाऊ वळेकर, प्रवीण वळेकर, सोमा गुरव, भैरू सांगडे, दादा पठाण, पप्पू पठाण तसेच मंडळाचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.
निंभोरे हे गाव समृध्दीने नटलेले गाव असून, या गावात सर्व जाती धर्माचे लोक अगदी एकोप्याने राहतात. मुस्लिम बांधवांचा सुद्धा प्रत्येक सामाजिक कामात सहभाग असतो, मुस्लिम बांधवांनी सुरू केलेले हे गणेश मंडळ अगदी कौतुकास्पद आहे. यापुढे या मंडळासाठी कायम सहकार्य राहिल. – रवींद्र वळेकर (सामाजिक कार्यकर्ते)