अनपेक्षित अन् अघटीत…
काल सायंकाळी पत्रकार नानामहाराज पठाडे यांचा फोन आला. त्यावेळी ते म्हणाले , बाबूराव झिंजाडे यांना उपचारासाठी बार्शीला नेले होते व उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. बातमी ऐकून धक्का बसला. वयाच्या पंचेचाळीत धडधाकट व्यक्तीचे अचानक जाणे हे धक्कादायक आहे. ह.भ.प. नवनाथ महाराज झिंजाडे यांचे ते छोटे बंधु. अत्यंत समजदार व कष्टाळू. शेती असो,दुध व्यवसाय असो,दुकानदारी असो प्रत्येक कामात बाबूराव यांचे काम वाखाणण्यासारखे होते. बाबूराव म्हणजे अजात शत्रू ना कोणाशी भांडण ना कोणाशी वादावादी. संयम आणि समन्वय हे धोरण त्यांनी लहानपणापासून स्वीकारले व विशेष म्हणजे राबवले. संसारात त्यांनी कधी हावहाव तर केली नाहीपण कामही कधी थांबवले नाही. त्यांच्या वाटचालीत पत्नी वैशाली व मुले निशांत व निखील यांचे मोठे योगदान होते. निशांत डी फार्मसी व निखील 12 चे शिक्षण घेत आहेत. खरतर संसाराची गाडी चढाला लागली असतानाच बाबूराव यांचं अचानक जाणे हे वेदनादायक आहे. पण नियतीपुढे कोणाचेच चालत नाही. स्व. बाबूराव साहेबराव झिंजाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!