आंदोलनानंतर लोकवर्गणीतुन करमाळा-हिवरवाडी रस्त्याचे खड्डे बुजविण्यास सुरुवात - Saptahik Sandesh

आंदोलनानंतर लोकवर्गणीतुन करमाळा-हिवरवाडी रस्त्याचे खड्डे बुजविण्यास सुरुवात

करमाळा(संदेश प्रतिनिधी) – करमाळा- हिवरवाडी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे हैराण झालेल्या हिवरवाडीकरांनी शासनाकडून रस्ता दुरुस्तीची कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने लोकवर्गणी मधून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात जमा झालेल्या ३० हजार वर्गणीमधून या रस्त्यावरील मोठे खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले असून अजून बाकी आहेत. यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन हिवरवाडीच्या सरपंच अनिता बापूराव पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले.

करमाळा-हिवरवाडी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. हिवरवाडी, भोसे, वडगाव (दक्षिण) या तिन्ही गावातील नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. या तिन्ही गावातील विद्यार्थी करमाळ्यात शिक्षणासाठी याच रस्त्यावरून सायकलवर येत असतात. अनेक वेळेला काही विद्यार्थी या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून या कामाकडे कुणीही लक्ष दिलेले नाही.

करमाळा- हिवरवाडी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत या मागणीसाठी प्रथम दि.४ ऑक्टोबर रोजी हिवरवाडी सरपंच अनिता पवार, सुप्रिया पवार व इतर नागरिक यांनी करमाळा तहसीलदार, करमाळा बांधकाम विभाग यांना रस्ता दुरुस्तीसाठी अर्ज केला होता. १२ ऑक्टोबर पर्यंत जर कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला होता. दरम्यान बांधकाम विभागाकडून सदर रोडवर साचलेले पाणी काढण्याची तजबीज करण्यात आली परंतु खड्डे बुजविले नाही. त्यामुळे १२ ऑक्टोबरला हिवरवाडी सरपंच अनिता पवार यांच्यासह तिन्ही गावातील काही विद्यार्थी व नागरिक यांनी एकत्र येत करमाळा तहसील कार्यालया समोर उपोषण करत आंदोलन सुरू केले.

उपोषणाला बसलेले विद्यार्थी व नागरिक

त्यानंतर प्रशासनाच्या वतीने उपअभियंता बाळासाहेब गायकवाड, श्री कन्हेरे, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड आदींनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी या रस्त्यासाठी शासनाकडे ५० लाखांचा निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दिला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले व दिलेले निवेदन स्वीकारले.

या उपोषणाला प्रा. रामदास झोळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, आदिनाथचे माजी संचालक रमेश कांबळे, भोसेचे प्रितम सुरवसे, माजी सरपंच भोजराज सुरवसे, वडगावचे उपसरपंच अंकुश शिंदे, सौरभ पवार आदींनी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान सरकारकडून निधी कधी उपलब्ध होऊन काम कधी होणार याची शाश्वती नसल्याने नागरिकांनी लोकवर्गणी करत मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा याचवेळी निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रा. रामदास झोळ, उपअभियंता बाळासाहेब गायकवाड, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, अतुल पाटील, दशरथ कांबळे आदींनी तात्काळ वर्गणी दिली. यानंतर जमा झालेल्या ३० हजार वर्गणीमधून या रस्त्यावरील मोठे खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले असून अजून बाकी आहेत.

लोकवर्गणीतून सुरू झालेले काम

  • लोकवर्गणीत योगदान देणाऱ्या व्यक्ती –
  • प्रा. रामदास झोळ – १० हजार रुपये
  • उपअभियंता बाळासाहेब गायकवाड – ५ हजार रुपये
  • नायब तहसिलदार बाबासाहेब गायकवाड – ५ हजार रुपये
  • अतुल पाटील – ५ हजार रुपये
  • दशरथ कांबळे – ५ हजार रुपये

करमाळा-हिवरवाडी हा रस्ता स्व. दिगंबरराव बागल यांच्या कार्यकाळात २०-२५ वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर याची डागडुजी केली गेली नाही. करमाळा-हिवरवाडीच्या खराब रस्त्याचा फटका हिवरवाडी,भोसे वडगाव (दक्षिण) या तिन्ही गावातील नागरिकांना होत आहे. रस्ता डांबरीकरणासाठी शासनाचा निधी कधी भेटेल याची शाश्वती नसल्याने लोकवर्गणीतुन मुरूम टाकून खड्डे भरून काढण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. मिळलेल्या लोक वर्गणीतुन काही मोठे खड्डे बुजवले असून अजून काही बाकी आहेत. त्यामुळे या सर्वांनी एकत्र येत राजकारण बाजूला ठेवत अजून लोकवर्गणीसाठी मदत करावी. तसेच हा रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी आपापल्या परीने शासनाकडे पाठवपूरावा करावा.

अनिता बापूराव पवार, सरपंच, हिवरवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!