देवळाली येथे दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : स्वत:च्या फायद्यासाठी व्हे परमीट पावडरचा वापर करून भेसळीचे दुध संकलन करणाऱ्या विरूध्द अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अन्न वऔषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नंदिनी सिध्देश्वर गिरमेठ यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की देवळाली येथे मे हॅटसन ॲग्रो प्रा.लि; येथे भेसळीचे दूध संकलीत होत असल्याची माहिती समजल्यावर तेथे गेलो असता, तेथे भारत धनाजी चोपडे हा भेटला व तो इन्चार्ज असल्याचे त्यांनी सांगितले. तेथे दुधा संदर्भात चौकशी केली असता निखिल बाबुराव कानगुडे याचे ३०० लिटर दुध संकलन केल्याची माहिती दिली.
सदर दुधामध्ये भेसळ असल्याचे संशयावरून भारत चोपडे यास निखिल कानगुडे यांचे घर दाखविण्याची विनंती त्यानंतर भारत चोपडेसह निखिल कानगुडे यांचे घरी कानगुडे वस्ती, देवळाली येथे गेलो असता घराच्या झडतीत व्हे परमीट पावडरचा (अपमिश्रक) ४० किलो इतका साठा आढळून आला. याबाबत निखिल कानगुडेकडे विचारणा केली असता गायदूधा मध्ये एस.एन.एफ वाढविण्याकरीता वापरत असल्याचे सांगितले.
दररोज ही पावडर मिसळून ३०० लि. दुध मे हॅटसन डेअरीला घालत असल्याचे सांगितले. चोपडे व कानगुडे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यावेळी भेसळ दुध व व्हे परमीट पावडर असा २० हजार ६०१ रूपयाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी करमाळा पोलीसात अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.