सरपंच पदाच्या निवडणुकीत चिखलठाण, घोटी, रावगाव, कंदर येथे बदल तर जेऊर, केम येथे प्रस्थापितांची पुन्हा सत्ता – प्रत्येक गटाचे सरपंच पदावर वेगवेगळे दावे..
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी उंदरगाव येथील निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित १५ ग्रामपंचायतीसाठी काल (ता. ५) मतदान झाले होते. आज (ता. ६) करमाळा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यात चिखलठाण, घोटी, जेऊर, केम सह कंदर या गावातील सरपंच पदाची जोरदार चर्चा झाली. यात घोटी, कंदर, चिखलठाण, रावगाव येथे बदल झाला तर जेऊर आणि केम येथे पूर्वीच्याच गटाचे सरपंच पद कायम राहिले आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गटाच्या नेत्याने वेगवेगळे दावे केलेले आहेत. त्यापैकी काही दावे वस्तुनिष्ठ असून काही ठिकाणी चुकीचेही दावे केलेले आहेत. असे असलेतरी या निवडणुकीत विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, माजी जयवंतराव जगताप तसेच माजी आमदार नारायण पाटील व माजी आमदार शामलताई बागल (बागल गट) या सर्वांनाच मतदारांनी संधी दिल्याचे चित्र दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनूसार खालीलप्रमाणे सरपंच पदाचे उमेदवार….
वीट येथे स्थानिकांचे म्हणणे सरपंच अपक्षाचा आहे परंतु वरीष्ठ मंडळीतून वीट येथील निवडलेले सरपंच महेश गणगे हे आमदार शिंदे गटाचे असल्याचे सांगितले जात आहे.
कोर्टी येथील नूतन सरपंच भाग्यश्री नाळे या बागल गटाच्या असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रावगाव येथे सत्ताबदल झाला असून तेथील जगताप गटाचे समर्थक दादासाहेब जाधव यांच्या गटाला पराभवाचा झटका बसला आहे. तेथे पाटील व बागल गटाच्या रोहिणी शेळके या विजयी झाल्या आहेत.
चिखलठाण येथे सर्वात जास्त गाजलेली लढत म्हणून येथील सरपंच पदाकडे पाहिले जाते. पूर्वीची सत्ता आमदार संजयमामा शिंदे समर्थक चंद्रकांत सरडे यांची होती. यावेळी श्री. सरडे यांच्या पत्नी वनमाला सरडे उभ्या होत्या. परंतु बागल व पाटील तसेच आ.शिंदे समर्थक राजेंद्र बारकुंड या गटाचे विकास गलांडे यांच्या पत्नी धनश्री गलांडे या विजयी झाल्या आहेत. घोटी येथे आमदार संजयमामा शिंदे समर्थक व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विलासकाका राऊत पाटील हे विजयी झाले आहेत. तसेच निंभोरे येथे आमदार संजयमामा शिंदे समर्थक रविंद्र वळेकर, गौंडरे येथे आमदार संजयमामा शिंदे समर्थक सुभाष हनपुडे त्याचप्रमाणे रामवाडी येथेही आमदार संजयमामा शिंदे समर्थक गौरव झांजुर्णे हे विजयी झाले आहेत.
कंदर येथील लढतीत प्रस्थापित भांगे गटास पराभवाचा चटका सहन करावा लागला असून, पंचरंगी लढतीत सर्वसामान्य समर्थक व जगताप गटाचे मौला मुलाणी हे विजयी झाले आहेत. यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष व कावळवाडीतील जनमतातून निवडलेले पहिले सरपंच गणेश करे-पाटील यांच्यामुळे गाजलेल्या कावळवाडी येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत बागल व पाटील गटाच्या उमेदवार राणी हाके या विजयी झाल्या आहेत.
केत्तूर येथे सर्वपक्षीय उमेदवार सचिन वेळेकर हे विजयी झाले आहेत. भगतवाडी येथे माजी आमदार पाटील गटाचे समर्थक माऊली भागडे, राजुरी येथे माजी पाटील गटाच्या समर्थक सोनाली भोसले तर जेऊर येथे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हे विजयी झाले आहेत.
केम येथील निवडणुकीत मोहिते-पाटील समर्थक व माजी आमदार नारायण आबा पाटील समर्थक अजित तळेकर यांच्या गटाच्या सारीका कोरे या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत तर १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सात सदस्य तळेकर गटाचे तर दहा सदस्य विरोधी गटाचे निवडले आहेत.
- संबंधित बातम्या
- सिंह आला पण गड गेला
- केम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सारिका कोरे
- जेऊर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता कायम – पृथ्वीराज पाटील सरपंच