नेरले ग्रामस्थांच्या वतीने ॲड रामराजे भोसले यांचा नागरी सत्कार संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – नेरले गावचे सुपुत्र ॲड रामराजे भोसले-पाटील यांची पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली त्याबद्दल नेरले ग्रामस्थांनी त्यांचा नागरिक सत्कार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी नेरले येथील हनुमान मंदिर येथे आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक धनंजय पन्हाळकर यांनी केले. आपल्या गावातील अनेक व्यक्ती उच्च पदस्थानी कार्यरत आहेत तेव्हा त्यांना जर आपल्याच गावातील ग्रामस्थांतर्फे शब्बासकीची थाप मिळाली तर त्यांना देखील आणखीन प्रगती करण्याची उर्जा मिळते तसेच गावातील तरुणांच्या पुढे एक आदर्श निर्माण होऊ शकतो आणि ही प्रेरणा घेऊन त्यांना देखील प्रगतीची दारे खुली होण्याचा मार्ग मोकळा होतो . अनेक संकटावर मात करून यशाचा शिखर गाठणे हे अँड.रामराजे भोसले यांनी सिद्ध करून दाखवले आहे तेव्हा त्यांचा आदर्श घेऊन गावातील तरुणांनी प्रगतीपथावर यावे असे आवाहन प्राध्यापक धनंजय पन्हाळकर यांनी केली.
याप्रसंगी नेरले गावचे माजी सरपंच शिवश्री औदुंबर राजे भोसले यांनी व्यक्तीचा सत्कार का होतो हे प्रत्येक तरुणाने जाणून घ्यावे आणि आपला एक दिवस असा सत्कार व्हावा यासाठी आपली प्रगती करावी असे मत व्यक्त केले तर पाहुणे काटुळे गुरुजी यांनी एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास करून तरुणांनी प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा व त्यासाठी ग्रामस्थांनीही त्यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात असे मत व्यक्त केले तसेच गावातील मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना रामराजे भोसले यांनी माझ्या या मातृभूमी , जन्मभूमीचे उपकार मी कधी विसरणार नाही मला जे यश प्राप्त झालेला आहे ते या गावातील मातीमुळे या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतल्यामुळे आणि आपल्या गावकऱ्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकलो आहे त्यामुळे या गावचे मी काहीतरी देणे लागतो या उद्देशाने मी गावकऱ्यांसाठी व तरुणांसाठी कोणतीही मदत करण्यास तयार आहे तेव्हा ग्रामस्थांनी माझा हा भव्य सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो.
या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पाहुणे मंडळी तसेच माजी माजी उपसरपंच काकासाहेब पाटील, माजी सरपंच अंकुश हंडाळ व आदी मान्यवर उपस्थित होतेनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत भोसले पाटील यांनी केले तर आभार अमित पाटील यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमित पाटील व त्यांच्या सहकारी मित्रांनी परिश्रम घेतले