२६ नोव्हेंबरला करमाळ्यात ‘संविधान बचाव मोर्चा’चे आयोजन – नागेश कांबळे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करमाळ्यात २६ नोव्हेंबर रोजी हजारो बहुजनांच्या उपस्थितीत संविधान दिनी ‘संविधान बचाव मोर्चा’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आरपीआय (आ) चे पश्चिम महाराष्ट्र संघटक व या मोर्चाचे नेतृत्व करणारे नागेश कांबळे यांनी दिली.
या रॅली विषयी माहिती देताना कांबळे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाचा आर्थिक सल्लागार विवेक देवराॅय याने संविधान बदलण्यासंबंधी लेख लिहीला होता, खासदार अनंत हेगडे याने ब्राम्हण परिषदेतील भाषणात “आम्ही संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आलो आहोत असे विष ओकले होते, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी देखील राज्यसभेत बोलताना संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनूवादी ब्राम्हणशाहीचे हस्तक असणारी हि विषवल्ली फोफावत चालली असून सर्व भारतीयांना हक्क व अधिकार देणारे अन समता, बंधूता, एकात्मता, जोपासणारे संविधान यांना नको आहे ते वाचवणे सर्वांची जबाबदारी आहे म्हणून संविधान बचाव मोर्चाचे आयोजन आम्ही केले आहे.
या मोर्चा च्या निमित्ताने संपूर्ण तालूक्यात संविधान जनजागृती बैठका आयोजित करण्यात आल्या व त्यास उदंड प्रतिसाद मिळत आहे. संविधानासाठी लोक स्वतःहून पूढे येत आहेत,रविवारी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी१२:३० वाजता करमाळा शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पूतळा येथून सूरू होणार आहे तरी होणा-या या मोर्चास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री कांबळे यांनी केले.