‘फटाका विक्री झाली – काम झाले’ या प्रवृत्तीने रस्ता बनला विद्रुप
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – ‘फटाका विक्री झाली – काम झाले’ या फटाका विक्रेत्यांच्या प्रवृत्तीने करमाळा-जेऊर रस्ता हा फटाक्याच्या कचऱ्याने विद्रुप झाला आहे.
दिवाळीच्या कालावधीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून करमाळा येथील फटाके विक्रेते हे महावीर उद्यानासमोर तात्पुरत्या प्रकारचे शेड उभारून फटाके विक्री करत असतात. दिवाळी संपल्यानंतर हे फटाके विक्रेते आपापले शेड काढून निघून जातात. परंतु जाताना फटाक्यांमुळे झालेला सर्व कचरा साफ करून जाण्याची सूचना करमाळा नगरपालिकेने केलेली असताना सुद्धा येथील फटाके विक्रेत्यांनी याची दखल घेतलेली नाही. फटाक्यांचे मोकळे बॉक्स, प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरीबॅग्ज, आदी कचरा तसाच सोडून हे विक्रेते निघून गेलेले आहेत.
करमाळा शहरात प्रवेश करण्याच्या या वर्दळीच्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शहराचे असे विद्रुप रूप पाहून यावे लागत आहे. या फटाका विक्रेत्यांनी दुकान बंद करताना कचऱ्याची विल्हेवाट लावावी तसेच नगरपालिकेने फटाका व्यवसायांना फटाके विक्रीनंतर झालेला कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची सक्ती करावी अन्यथा दंड लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.