शेटफळ येथील २३ वर्षीय शेतकरी युवकाने केली उत्तम 'स्ट्रॉबेरी'ची शेती.. - Saptahik Sandesh

शेटफळ येथील २३ वर्षीय शेतकरी युवकाने केली उत्तम ‘स्ट्रॉबेरी’ची शेती..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळ (ता करमाळा) येथील 23 वर्षीय चेतन बाबुराव निंबाळकर या तरुणांनी आपल्या अर्धा एकर शेतात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला असून त्याने आपल्या शेतात पिकवलेल्या स्ट्रॉबेरीचे स्वतःच मार्केटिंग सुरू केले आहे तालुक्यातील करमाळा तालुक्याबरोबरच इतर तालुका व छोट्या गावातील फळ विक्रेत्यांनाही स्ट्रॉबेरी जागेवर पोहच करून आपल्या शेतात पिकवलेल्या मालाच्या मार्केटिंगचे तंत्र ही त्याने स्वतःच विकसित केले आहे.

मेकॅनिकल डिप्लोमा चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चेतनला महेंद्रा कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली होती, परंतु नोकरी मिळाली आणि दोन महिन्यात लॉकडाऊन झाल्याने गावाकडे यावे लागले. गावाकडे आल्यानंतर त्यांनी आपल्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ऊस, केळी या पिकामध्ये चांगले उत्पादन मिळवले काही काळ शेती करत केळीचे मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम केले. महिंद्रा कंपनीमध्ये असताना कंपनीतील सर्व मित्र एकदा महाबळेश्वरला त्याच्या एका मित्राच्या नातेवाईकांकडे गेले होते.

त्यांची ‘स्ट्रॉबेरी’ची शेती त्यापासून मिळणारे चांगले उत्पन्न पाहिले होते, गावाकडे आल्यानंतर शेती करत आसताना आपल्याही शेतात का स्ट्रॉबेरी येऊ शकणार नाही, असा त्याला प्रश्न पडला मित्राच्या नातेवाईकांना फोन करून स्ट्रॉबेरी विषयी माहिती घेतली आणि मी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केल्यानंतर आपण मला मार्गदर्शन करणार का असे विचारले. त्यांनीही आनंदाने सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्याचे मान्य केले आणि महाबळेश्वर येथील नर्सरी मधून सहा हजार रोपे आणून आपल्या अर्धा एकर शेतावर व त्याची २२ सप्टेंबर रोजी लागवड केली. त्याचे योग्य ते खत व पाणी व्यवस्थापन हे केले.

उत्तम असे पीक उभा केले. साठ दिवसानंतर या स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले असून आतापर्यंत निघालेल्या स्ट्रॉबेरीचे व्यवस्थित ग्रेडिंग पॅकेजिंग करून काही माल पुणे बाजारपेठेत पठवला तर उर्वरित मालाचे व्यवस्थित पॅकिंग करून , करमाळा, माढा,बार्शी, कर्जत, इंदापूर, परांडा तालुक्यातील छोट्या गावातील स्थानिक किरकोळ फळ विक्रेत्यांकडे स्वतः जाऊन पोहोच करत आहे. त्याच्या स्ट्रॉबेरीला असलेली गोडीमुळे त्याला चारशे रुपये किलोपर्यंतचा दर मिळत असून त्याच्या या सर्व ठिकाणावरून पुन्हा पुन्हा चांगली मागणी होत आहे. त्याच्या शेतातील अर्धा एकर स्ट्रॉबेरीतून त्याला तीन ते चार टन उत्पादन अपेक्षित असून सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळू शकणार आहे.

“माझे बारावीनंतरचे शिक्षण पुण्यात झाले. शिक्षण घेत असताना पुण्यात काही ठराविक फळपिकांना कायमच चांगला भाव मिळतोय हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे बाजारपेठेत ज्या पिकाला चांगली मागणी आहे, तेच आपण शेतात पिकवले पाहिजे, म्हणून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या स्ट्रॉबेरी सारख्या नवीन पिकाची निवड केली. माझ्या परिसरातील वातावरणाची या पिकासाठी आणि अनुकूलता आहे की नाही याची शंका होती, परंतु त्याच्यावर मात करत “स्ट्रॉबेरी” उत्पादनात मी नक्कीच यशस्वी झालो आहे व स्वतः मार्केटिंग करत असल्याने उत्पन्नही चांगले मिळेल याची खात्री आहे.” – चेतन निंबाळकर (स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, शेटफळ..)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!