एसटी थांब्यावर लूट होत असल्यास प्रवाशांनी तक्रार करावी – ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष ॲड. नरुटे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ठाकरे सरकारने सुरू केलेली ‘एसटी’ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम अजूनही सुरू असून याबाबत कोणत्याही थांब्या वर पालन होत नसेल तर प्रवासी तक्रार करून कारवाईची मागणी करू शकतात अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे करमाळा तालुकाध्यक्ष ॲड शशिकांत मुरलीधर नरुटे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, ही योजना अधिकृत MSRTC थांबे, ढाबे, हॉटेल्सना बंधनकारक आहे. त्यासंदर्भात 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नव्याने परिपत्रक जारी केले असून चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त होत असल्याने हॉटेल व्यवस्थापनावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महामंडळाने विभागीय व जिल्हा स्तरावरील नियंत्रक कार्यालयांना दिले आहेत. याशिवाय, ST अधिकृत थांब्यांवर पाणी बाटलीची 15 रुपयांपेक्षा जादा दरात विक्री करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सोशल मीडियातून गेल्या काही दिवसांपासून या 30 रुपयांत चहा-नाश्ता योजनेची चर्चा सुरू आहे. त्याबाबत शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने ‘एसटी’च्या नियोजन व पणन महाव्यवस्थापकांनी 25 मे रोजी आदेश काढले आहेत. “नाथजल पाणी बाटली छापील किंमतीपेक्षा जादा दरात विक्री होत असल्याबाबत व रा.प. अधिकृत खाजगी थांब्यांवर रु. 30/- मध्ये चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबाबत” हे परिपत्रक आहे. (क्र. राप/निवप/वाआ/555) एसटी’ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील आघाडी सरकारने घेतलेला जनहिताचा निर्णय फडणवीस-शिंदे सरकारने कायम ठेवला आहे.
तक्रार कशी करावी?
- जर प्रवाशांना ST बस थांबलेल्या ठिकाणी 30 रुपयांत चहा-नाश्ता दिला जात नसेल किंवा पाणी बाटलीसाठी 15 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असेल, तर तात्काळ संबंधित बसच्या चालक-वाहकाकडे तक्रार करावी. वाहकाकडे तक्रार पुस्तक उपलब्ध असते. त्यात लेखी तक्रार करावी.
- येणाऱ्या जवळच्या थांबा असलेल्या आगारातील नियंत्रकाकडे लेखी तक्रार करावी. याशिवाय, पुढील मध्यवर्ती कार्यालयातही तक्रार करता येईल – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी), नियोजन व पणन खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई-4000008 दूरध्वनी क्र.022-23023939 ई-मेल : gmplanning@rediffmail.com
- ऑनलाईन तक्रार नोंदवा –https://cutt.ly/ST-Online-Complaint-